कुंपणच शेत खातंय; बनावट दस्तावेज तयार करून ग्रामसेवकानेच केला साडेपाच लाखाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 07:43 PM2019-06-10T19:43:46+5:302019-06-10T19:45:16+5:30
खोटा दस्ताऐवज तयार करत शासनाची ५ लाख ४० हजाराची फसवणूक करुन पुरावा नष्ट केला.
बीड : कुंपनानेच शेत खाण्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात समोर आला आहे. शासनाची तब्बल ५ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध रविवारी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साहेबराव महादेव भताने (रा.पट्टीवडगाव, ता.अंबाजोगाई) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी पट्टीवडगाव येथील शेतकरी दिनकर वसंतराव लव्हाळे यांनी बदार्पूर ठाण्यात नमूद केलेल्या तक्रारीनुसार ३ सप्टेंबर २०१६ ते २०१९ पर्यंत संबंधीत ग्रामसेवक भताने हा पट्टीवडगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. याठिकाणी बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याने सार्वजनिक नोंद पुस्तक तयार करुन खोटा दस्ताऐवज तयार करत शासनाची ५ लाख ४० हजाराची फसवणूक करुन पुरावा नष्ट केला.
या प्रकरणी लव्हाळे यांनी अंबाजोगाईच्या जे.एम.एक्सी न्यायालयात फिर्याद नोंदवली होती. तेथून हे प्रकरण १५६ (३) सीआरपीसी प्रमाणे प्राप्त झाल्यानंतर बर्दापूर ठाण्यात भतानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.