३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:15 AM2017-12-25T01:15:38+5:302017-12-25T01:15:45+5:30

साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

A grand inauguration of the 39th Marathwada Sahitya Sammelan | ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देमाणसाची अधोगती रोखण्याचे सामर्थ्य साहित्यातच - पंकजा मुंडे

अविनाश मुडेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई (आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक नगरी) बाबासाहेब परांजपे व्यासपीठ - साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथे बीड जिल्हा शिक्षण विभाग आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. तर व्यासपीठावर ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे, खा. रजनीताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर, आ. संगिता ठोंबरे, नगराध्यक्षा रचना मोदी, माजी आ. उषा दराडे, जि. प. सभापती शोभा दरेकर, संजय दौंड, अ‍ॅड. आनंदराव चव्हाण, जि.प. चे सभापती संतोष हंगे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, शिक्षणाधिकारी भावना राजनूर, म.सा.प. अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील, उपाध्यक्ष किरण सगर, सचिव दादा गोरे, भास्कर बडे, अमर हबीब, दगडू लोमटे, भगवानराव सोनवणे, व्यंकटेश गायकवाड, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपस्थित होते.

साने गुरूजी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वाटचाल या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तर साहित्य परिषदेच्या वतीने वि. अ. कानोले लिखित मुकुंदराजांची अंबानगरी कोणती? या ग्रंथाचे प्रकाशन तसेच संत कवी विष्णुदास विशेषांकाचे प्रकाशनही झाले.


म.सा.प.चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अध्यक्षपदाची सुत्रे प्रा. रंगनाथ तिवारी यांच्याकडे सुपूर्द केली. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्यांची जडणघडण झाली ते आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्यामुळे गोपीनाथ मुंडे- प्रमोद महाजनांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, याच्या आठवणी विशद केल्या.
संमेलनाध्यक्ष प्रा. तिवारी यांचा परिचय वैशाली कंकाळ यांनी करून दिला. प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. संचालन योगीराज माने यांनी केले. आभार वैशाली गोस्वामी यांनी मानले.

जाणीव व उणीव हे शब्दांचे खेळ ज्याला कळतात तो जीवनात यशस्वी होतो
अंबाजोगाई शहराने प्राचीन काळापासून सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. अंबाजोगाईच्या साहित्यिकांनी देशात लौकिक केला. त्यामुळेच हे साहित्य संमेलन यशस्वीरीत्या पार पडत आहे. माणूस आठवणीत जगत असतो. ही आठवण माणसाला इतिहासात नेते. ज्याला इतिहास कळला, त्याला भविष्य कळते. यासाठी माणसाचं जीवन हे सुसंगत करण्यासाठी जीवनाला साहित्याची जोड असली पाहिजे. माणसाला आपली अभिव्यक्ती मांडता आली पाहिजे. श्रोता व वक्ता हे नातं कळलं पाहिजे. शब्दांमध्ये मोठी ताकद असते. जाणीव व उणीव हे शब्दांचे खेळ ज्याला कळतात तो जीवनात यशस्वी होतो. आज समाजामध्ये जी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, ती अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी लोकांच्या मनातील शांतता हिरावून घेऊ नये.
- पंकजा मुंडे, उद्घाटक

शिक्षण व साहित्य यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी हा साहित्य संमेलनाचा खटाटोप
मराठवाडा हा सर्वच बाबतीत मागासलेला समजला जातो. हा कलंक दूर करण्यासाठी सामूहिक पुढाकाराची गरज आहे. प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात ठोसपणे काम केले तर हा कलंक पुसून झाली अशी अपेक्षा त्यांनी केली. इंग्रजी भाषा माणसाला अवगत झाली नाही तर त्याची कुचंबणा होते. याचा प्रत्यय आपण अनुभवला. ही वेळ पुन्हा ग्रामीण भागातल्या माणसावर पुन्हा येऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना पहिलीपासूनच सेमी इंग्रजीचे शिक्षण हा निर्णय आपण घेतला. शिक्षण व साहित्य यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी हा साहित्य संमेलनाचा खटाटोप आहे.
- राजेसाहेब देशमुख स्वागताध्यक्ष

साहित्य संमेलन प्रेरणादायी
तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने क्रांती घडत असताना मोबाईलचा अतिवापर ही आजच्या बालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलचा अतिवापर टाळायला लावून पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करावी. बीड जिल्ह्याला धार्मिक, सामाजिक, सहिष्णुतेचा इतिहास आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचे वेगळेपण समोर येते. एका शिक्षकाच्या मुलाने शिक्षण सभापती झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून भरविलेले हे साहित्य संमेलन प्रेरणादायी आहे. अंबाजोगाईतला साहित्यिकांचा मोठा वारसा असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून या शहराने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याने अंबाजोगाईचे वेगळेपण आजही महाराष्ट्रात टिकून आहे.
- रजनीताई पाटील
प्रमुख अतिथी

शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत
देशातील शेतक-यांच्या प्रश्नांकडे सर्वच सरकारे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकºयांच्या विरोधात २५४ कायदे आहेत. या जाचक कायद्यांमुळे शेतकरी मरण जवळ करीत आहेत. या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण याला कारणीभूत आहे. तसेच चित्रपट निर्माते अप्रामाणिकपणे काम करीत असून इतिहास सांगण्यापेक्षा काल्पनिक चित्र रंगवून त्यांची नजर फक्त गल्ल्यावरच आहे. या माध्यमातून लोकभावनेचा मोठ्या प्रमाणात अनादर होत आहे. - कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मसाप

Web Title: A grand inauguration of the 39th Marathwada Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.