घरातून हद्दपार झालेल्यांचा मात्यापित्यांचा आधार भक्तीप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:14 PM2019-03-09T17:14:58+5:302019-03-09T17:18:30+5:30
कसलेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकांच्या पाठबळावर कार्य सुरु आहे
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई (जि. बीड) : जीवनात अपार कष्ट सोसल्यानंतर आयुष्याचा उत्तराधार्थ सुखात जावा ही अपेक्षा वृद्ध बाळगून असतात. मात्र, यात अनेकांच्या वाट्याला निराशाच येते. अशा निराश वृद्ध माता-पित्यांचा अंबाजोगाई येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम खऱ्या अर्थाने आधार बनला आहे. आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर सध्या नाकारलेल्या २७ वृद्धांचा आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळ करत आहे. कसलेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकांच्या पाठबळावर त्याचे हे काम अडीच वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालयातून सामाजिक शिक्षण घेताना डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा प्रभाव आणि अनेक वृद्धांचा सहवास लाभल्याने पवन यास वृद्धांच्या समस्या, त्यांची गरज, अडचणी समजल्या. काहीतरी करण्याच्या उर्मीने वृद्धांसाठी आश्रम काढायचा संकल्प केला. अंबाजोगाई परिसरात त्या काळात समस्त महाजन ग्रुपतर्फे जलसंधारणाची कामे होत होती. त्यावेळी पवन याने भारतीय जैन संघटनेचे धनराज सोळंकी यांच्या माध्यमातून समस्त महाजनचे अध्यक्ष गिरीशभाई शहा यांच्याशी संपर्क साधला. वृद्धाश्रमाची संकल्पना त्यांनाही पटली. देवेंद्र जैन, नूतन देसाई, पृथ्वीराज कावेरिया, अल्पेश जैन यांच्या प्रेरणेतून अंबाजोगाई-परळी रस्त्यावर दूरदर्शन केंद्राच्या बाजूला जीवनआधार भक्तीप्रेम इमारत गिरीशभाईंनी उभी करून दिली.
सुरुवातीला बसस्थानक परिसरातील निराधार, वृद्धांचा सांभाळ पवनने सुरु केला. आज २० पुरुष व ७ वृद्ध महिला येथे आश्रयाला आहेत. या सर्व वृद्धांची सेवा शुश्रुषा पवन एखाद्या कुटुंबाप्रमाणे करतो. त्यांना काय हवे, काय नको ही सर्व जबाबदारी तो समर्थपणे पार पाडतो. वृद्धांना दोनवेळचे जेवण, दोन वेळा चहा, प्रार्थना, श्रमदान असा आश्रमाचा दिनक्रम ठरलेला आहे. या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
प्रत्येकाने उचलला खारीचा वाटा
१५ आॅगस्ट २०१६ रोजी सुरु झालेल्या या आश्रमाची वाटचाल लोकांच्या पाठबळावरच सुरू आहे. आश्रमाचा प्रत्येक महिन्याचा किराणा उचलण्याची जबाबदारी अंबाजोगाई तालुक्यातील आठ दानशुरांनी घेतली आहे. तर चार महिने शिल्लक आहेत. आश्रमाचे वीजबील, भाजीपाला व गॅस सिलिंडरचा खर्च करण्यासाठी दानशुरपुढे सरसावले पाहिजे. या आश्रमातील वृद्धांच्या औषधांचा खर्च अंबाजोगाईचे श्रीकांत बजाज, ललित बजाज व शाम बजाज करतात. पाण्याची व्यवस्था, इंधन विहीर, शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुविधा धनराज सोळंकी यांनी उपलब्ध करून दिली. आता गरज आहे ती दानशुरांच्या पाठबळाची .
रुग्णवाहिकेची गरज
वृद्धाश्रम ते अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे अंतर जवळपास १० किलोमीटर आहे. आश्रमातील वृद्धांना सातत्याने वैद्यकीय उपचारासाठी रिक्षा अथवा दुचाकीवरुन नेण्याची वेळ गिरवलकर यांच्यावर येते. त्यांना वृद्धांसाठी रुग्णवाहिकेची आता नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
वृद्धच चालवतात गोशाळा
जीवन आधार भक्तीप्रेम आश्रमातील वृद्धांनीच पवन गिरवलकर यांच्याकडे आग्रह धरुन गोशाळा सुरु केली. या गोशाळेमध्ये गायींची संख्या वाढली आहे. ही गोशाळा येथील वृद्धच सांभाळतात. इतकेच नाही तर वृद्धाश्रमात स्वयंपाक, स्वच्छता या कामातही आश्रमातील वृद्धांचाच पुढाकार असतो. या आश्रमात एकही कर्मचारी कामासाठी नाही. हा आश्रम संपूर्ण कुटुंबाप्रमाणे चालतो.