धक्कादायक! 'फराळ नको, भाकरी बनवून दे', म्हणत नातवाने केला ८२ वर्षीय आजीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:32 PM2023-11-24T12:32:12+5:302023-11-24T12:33:50+5:30
दगड आणि काठीने बेदम मारहाण केल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला, २९ वर्षीय नातू पोलिसांच्या ताब्यात
दिंद्रुड ( बीड): 'मी एकादशीचा फराळ खाणार नाही, भाकरी करून दे', असा वाद घालत २९ वर्षीय नातवाने आपल्या ८२ वर्षीय आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील लोणगाव येथे गुरुवारी घडली. दरम्यान, दिंद्रुड पोलिसांनी आरोपी नातवास ताब्यात घेतले आहे.
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील लोणगाव येथे कौशल्याबाई किसनराव राऊत (वय 82 वर्ष), बालासाहेब किसनराव राऊत (वय 56 वर्ष) राहुल बालासाहेब राऊत (वय 29 वर्ष) हे तिघे राहत. गुरुवारी कार्तिकी एकादशीनिमित्त उपवासा असल्याने कौशल्याबाई यांनी सर्वांसाठी फराळाचा स्वयंपाक केला. मात्र, दुपारी तीन वाजेदरम्यान राहुलने मला फराळ नको, भाकरी करून दे म्हणत आजी कौशल्याबाई यांच्यासोबत वाद घातला. एवढ्यावरच न थांबता राहुलने दगड आणि काठीने आजीस बेदम मारहाण केली. डोक्यात गंभीर जखमा झाल्याने आजी कौशल्याबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, माहिती मिळताच दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणीकरून पंचनामा केला. मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. गुरुवारी रात्री दहा वाजता मयत कौशल्याबाई यांचा मुलगा बालासाहेब किसनराव राऊत यांच्या फिर्यादीवरून राहुल बालासाहेब राऊत यांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असुन पुढील तपास सपोनि अण्णाराव खोडेवाड करत आहेत.