अनुदान वाटप प्रकरण; बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अपील सहकारमंत्र्यांनी फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:20 PM2020-10-16T13:20:02+5:302020-10-16T13:23:17+5:30
Beed Jilha Bank १९ डिसेंबर २०१९ रोजी विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष आदित्य सारडा व मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब देशमुख यांना पदावन केले होते.
बीड : शेतकरी सन्मान योजनेतील पात्र १७ हजार १४ शेतकऱ्यांना २१ कोटी ८८ लाख ८१ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान राज्य शासनाने मंजूर केले होते. या योजनेच्या निकषाप्रमाणे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली नाही. त्यामुळे बॅँकेचे अध्यक्ष व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लातूर येथील सहनिबंधकांनी सहकार कायद्यातील कलमानुसार पदावनत केले. याविरोधात अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सहकार व पणनमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. हे अपील फेटाळत विभागीय सहनिबंधकांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.
१९ डिसेंबर २०१९ रोजी विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष आदित्य सारडा व मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब देशमुख यांना पदावन केले होते. या आदेशाविरुद्ध सारडा व देशमुख यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील दाखल केले. दरम्यान आदित्य सारडा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सारडा यांची बाजू ऐकून घेईपर्यंत न्यायालयाने त्यांना अध्यक्षपदावर राहण्यास मुभा दिली होती. दरम्यान १४ आॅक्टोबर रोजी सहकारमंत्र्यांनी सारडा व देशमुख यांचे अपील फेटाळत विभागीय सहनिबंधकांचा निर्णय कायम ठेवला.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जिल्हा बँकेला १७ हजार १४ पात्र शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ८८ लाख ८१ हजार रु पये प्रोत्साहन अनुदान मंजूर केले होते. ही रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश होते. मात्र हे निर्देश पाळले नसल्याचा ठपका ठेवला होता.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झाला नाही पक्का रस्ता https://t.co/8UuKm68AOt
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 16, 2020
कोणाचीही तक्रार नाही
सहकारमंत्र्यांनी दिलेला आदेश अन्यायकारक असून ज्या व्यक्तींच्या नावाने बँकेला प्रोत्साहन अनुदान मिळाले होते. ते अनुदान त्याच व्यक्तींच्या खात्यावर दिलेले आहेत. यासंबंधी एकही तक्र ार प्राप्त नाही. तरीही ही अन्यायकारक कार्यवाही केली. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा म्हणाले.