दोन वर्षांपासून चारा छावणींचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:50+5:302021-05-08T04:35:50+5:30
बीड : जिल्ह्यात २०१८ साली दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाई भेडसावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. ...
बीड : जिल्ह्यात २०१८ साली दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाई भेडसावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. या काळात ६०८ छावण्यांवरून जनावरांना चारा पुरवण्यात आला होता. या चारा छावणी चालकांना देण्यात येणारे अनुदान दोन वर्षांनंतरदेखील रखडलेले आहे. जवळपास १७ कोटी ६६ लाख ८७ हजार ३७६ रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
सेवाभावी संस्थांच्या वतीने २०१८ साली चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुष्काळात जिल्ह्यातील पशुधन पोसण्यासाठी मोठी मदत मिळाली होती. तर, काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेकांवर कारवाईदेखील करण्यात आली होती. अनेक चारा छावणी चालकांची रक्कम कमी करण्यात आली होती. दरम्यान, ६०८ चारा छावण्यांवर जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आहे. दरम्यान, छावण्यांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे अनुदान रखडले होते. ते अद्यापदेखील मिळालेले नाही. त्यामुळे अनेक चारा छावणी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी अनुदानाची मागणी करून ते वाटप केले आहे. तरीदेखील जवळपास १७ कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान अद्याप देणे बाकी आहे. त्याचीदेखील मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. हे अनुदान तत्काळ शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करावे व छावणी चालकांना वाटप करावे, अशी मागणी होत आहे.
..
चारा छावण्या ३०८
अंदाजे खर्च ३०० कोटी
अनुदान मागणी १७ कोटी ६६ लाख
...
चारा छावणीमुळे शेतकऱ्यांचे पशुधन भीषण दुष्काळातदेखील वाचले. अनेक छावणी चालकांनी सेवाभाव वृत्तीतून छावण्या सुरू केल्या होत्या. शासनाच्या नियमात नसतानादेखील अनेक सुविधा शेतकऱ्यांना स्वखर्चातून काही छावणी चालकांनी दिल्या होत्या. मात्र, अनुदान रखडल्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. तरी तत्काळ अनुदान देण्यात यावे.
-सचिन कोटुळे, छावणी चालक
...........................
शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी चारा छावणी उभारली होती. अनुदानाची रक्कम दोन वर्षांनंतरदेखील शिल्लक आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने याची दखल घेऊन शिल्लक अनुदानाची रक्कम देण्याची कार्यवाही करावी.
-अशोक सुखवसे, छावणी चालक
===Photopath===
070521\07_2_bed_11_07052021_14.jpg
===Caption===
चारा छावणी