विहिरींचे आमिष दाखवून लाटले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:13+5:302021-09-17T04:40:13+5:30
बीड : जिल्ह्यात रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनत असून विहिरींचे आमिष दाखवून शेतकऱ्याच्या नावावर परस्पर सव्वा तीन लाख ...
बीड : जिल्ह्यात रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनत असून विहिरींचे आमिष दाखवून शेतकऱ्याच्या नावावर परस्पर सव्वा तीन लाख रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार १६ सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत उघडकीस आला. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकासह संगणक परिचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
उमराई (ता. अंबाजोगाई) येथील शेतकरी शिवाजी दगडू केंद्रे यांनी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार, सन २०१७ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत उमराई येथील शिवाजी केंद्रे यांना संगणक परिचालक नितीन जनार्दन केंद्रे व ग्रामरोजगार सेवक भास्कर ज्ञानोबा केंद्रे यांनी विश्वासात घेतले. आम्ही तुमच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मिळवून देतो असे सांगत शिवाजी केंद्रे यांच्याकडून सात बारा, आधार कार्ड, नमुना ८-अ व फोटो घेतले. याच कागदपत्राच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर विहीर कामकाजाच्या हजेरी मस्टरची बनावट प्रत काढून बिल उचलले. तसेच शिवाजी केंद्रे व इतर शेतकऱ्यांचे बनावट खाते उघडून त्यांना रोहयोचे मजूर दाखवून ३ लाख ३३ हजार ७५४ रुपयांची रक्कम हडप करून शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केली. त्यावरून नितीन केंद्रे व भास्कर केंद्रेवर गुन्हा नोंद झाला.