बीडच्या सह्याद्री-देवराईत दोन एकरांतील गवताला आग; झाडे सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:26 PM2022-02-13T16:26:29+5:302022-02-13T16:26:37+5:30
खोडसाळपणा की वणवा पेटला : पर्यटनासाठी कडक निर्बंधांची गरज
बीड : शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्री-देवराई परिसरात शनिवारी दुपारी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर गवत जळाले असून, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वणवा पेटला, की कोणी खोडसाळपणा केला, याचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, झाडे सुरक्षित असून, दोन एकर परिसरातील गवत जळाल्याची पुष्टी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री-देवराई परिसराच्या माथ्यावर वन कर्मचारी पाणी देत हाेते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील गवताने पेट घेतल्याचे दिसून आल्यानंतर आग शमविण्यासाठी धावपळ सुरू झाली. एअर ब्लोअर मशीन, तसेच झुडपे व तुऱ्हाट्या आणून आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न झाला. दीड तासानंतर आग आटोक्यात आल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. सह्याद्री-देवराई परिसरात आग लागल्याचे समजल्यानंतर वपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली. दरम्यान, रविवारी परिसरात पाणी देण्याचे काम वन कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होते.
दोन अंदाज
पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने गवत वाढले आहे. उन्हामुळे ते वाळत असल्याने वणवा पेटला असावा, असा एक अंदाज आहे, तर परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून किंवा कोणी खोडसाळपणे, हेतुपुरस्सर हा प्रकार केला, हे तपासले जाणार आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असून, वन अधिकारी तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
जंगल वाचले
वेळीच एअर ब्लोअरचा वापर व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग नियंत्रणात आली. परिसरात जाळपट्टे तयार केल्याने आग पसरली नाही. खड्ड्यांवर गवत नसल्याने झाडांना झळ बसली नाही. झाडे सुरक्षित राहिली अन् जंगल वाचले. घटनास्थळ परिसर दोन वर्षांपूर्वी झालेल्या वृक्षसंमेलनात वड महाराजांच्या झाडापासून, तसेच घन वनापासून काही अंतरावरच होता.
सयाजी शिंदेंना चिंता, म्हणाले झाडांचे नुकसान झाले का
सिनेअभिनेता व सह्याद्री-देवराईचे प्रवर्तक सयाजी शिंदे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्याशी संपर्क करून कशामुळे घटना घडली, झाडांचे नुकसान झाले का, याबाबत विचारणा केली. त्यावर खड्ड्यावर गवत नसल्याने झाडे सुरक्षित राहिल्याचे व दोन एकरातील गवत जळाल्याची माहिती मुंडे यांनी शिंदे यांना दिली.
बीडचे वैभव जपण्याची गरज
मागील चार वर्षांपासून पालवण परिसरातील वन विभागाच्या २०७ हेक्टर क्षेत्रात सयाजी शिंदे व सह्याद्री-देवराई परिवार आणि वन विभागाच्या सहकार्याने १ लाख ६४ हजार झाडे लावून हा परिसर फुलविण्याचा प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे. या ठिकाणी प्रवेश करताना वन विभागाने सूचना फलक लावलेले आहेत. परिसरात फिरायला, सहलीला, वाढदिवस साजरा करायला अनेक जण येथे येतात. मात्र, शनिवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता देखरेखीसाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती, तसेच येणाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्याची गरज असून, नागरिकांनीही वनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबाबत सकारात्मक राहण्याची गरज आहे.