शासकीय कार्यालयांभोवती वाढले गवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:15+5:302021-08-26T04:36:15+5:30

धारुर : मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ...

Grass grown around government offices | शासकीय कार्यालयांभोवती वाढले गवत

शासकीय कार्यालयांभोवती वाढले गवत

Next

धारुर : मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला व शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम लगतच्या लोकवस्तीवर होत असून, शहर व ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जागृतीची गरज

वडवणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ग्रामीण भागात व शहरातील नागरिकांची गती मिळत नसल्याची स्थिती आहे. लस उपलब्ध असतानाही ऑनलाइनच्या गोंधळामुळे नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने तसेच सामाजिक संस्थांनी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिक बोलतात.

प्लॅस्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर

माजलगाव : महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सुरू असून, प्रशासनाची नियंत्रण मोहीम थंडावली आहे.

कृषी औषध खरेदीसाठी गर्दी

धारूर : तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरिपाची पिके जोमात आहेत; मात्र सोयाबीन, कपाशी व अन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे खते व कृषी औषो खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्याची मागणी

वडवणी : कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे होत आहेत. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी या अनुदान वाटपाची मागणी केली आहे.

वेगवान वाहनांमुळे अपघातात वाढ

अंबाजोगाई : शहर व तालुक्यात सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरगर्दीच्या रस्त्यातही काही टवाळखोर युवक सुसाट वेगाने दुचाकी चालवीत असल्याने इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. सुसाट वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघातही वाढले आहेत. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची गरज आहे.

पावसाळ्यापूर्वी फवारणी करावी

अंबाजोगाई : कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात विविध साथीचे आजार डोके वर काढत आहेत. पावसामुळे दलदल निर्माण होऊन डासांचा उपद्रव वाढला असून, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींनी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Grass grown around government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.