मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टरांविषयी कृतज्ञता; अपंगांना प्रमाणपत्र पुरविण्याची मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 04:43 PM2022-09-27T16:43:24+5:302022-09-27T16:46:14+5:30
मित्रा साठी एक दिवस धंदा न करता सेवा करायची. दुकान उघडायचे. सेवा द्यायची पण पैसे घ्यायचे नाहीत.
अंबाजोगाई (बीड): कर्करोगाच्या आजाराने पोटच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. आज त्याच्या स्मृती प्रित्यर्थ वडिलांनी स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान केला. जे अपंग व्यक्ती प्रमाणपत्र काढतात त्यांना मोफत कागदपत्रे उपलब्ध करून देत, त्यांना चहापाणी व गुलाबपुष्प देऊन सत्कार, असा हा अनोखा उपक्रम खाणावळवाले बाबूभाईं उर्फ मुस्तफा खान यांनी मंगळवारी रुग्णालय परिसरात राबविला. एक सामान्यव्यक्ती ही समाजासाठी असामान्य कार्य करू शकते.याचा प्रत्यय बाबूभाईंनी समाजासमोर ठेवला आहे.
आज वेगवेगळे पक्ष, संघटना, मंडळे कार्यक्रम घेत असतात. पण हा कार्यक्रम ना पक्षाचा, ना संघटनेचा, ना कोण्या पुढाऱ्याचा. हा कार्यक्रम आहे, अगदी सामान्य लोकांचा. बाबू भाई (मुस्तफा खान) हे डबे पोचवणारी खानावळ चालवतात. मेडिकल कॉलेजच्या समोर अनेक वर्षे चहाचे हॉटेल चालवले. त्यांचा मुलगा मोहसीन नुकताच हाताला आला होता. तेवढ्यात त्याला कॅन्सर झाला. त्यात तो गेला. बाबूभाईनी त्यासाठी जी धडपड केली. त्याला तोड नाही. या काळात डॉक्टर लोकांचे काम त्यांना जास्त जवळून पाहता आले. खरे तर डॉक्टर लोकांशी त्यांची खूप जुनी मैत्री. पण या अनुभवाने त्यांना हळवे केले.
तरुणपणातील मैत्री वाहवत जाते. असे म्हटले जाते पण ते सर्वांसाठी खरे नाही. मोहसीनचे जग म्हणजे मेडिकलचे गेट. येथील तरुणाचा तो लाडका होता. त्याच्या मित्रानी ठरवले आपल्या मित्रा साठी एक दिवस धंदा न करता सेवा करायची. दुकान उघडायचे. सेवा द्यायची पण पैसे घ्यायचे नाहीत. या निमित्ताने डॉक्टरांचा सत्कार केला जाणार आहे. हा छोटेखानी कार्यक्रम आज सकाळी १० वाजता मेडिकलच्या गेटवर झाला.किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते तथा जेष्ठ पत्रकार अमर हबीब, पत्रकार अविनाश मुडेगावकर यांना त्यांनी कार्यक्रमात सामील करून घेतले.
कोणताच हेतू नाही. कोणताच लाभ मिळवायचा नाही. कोणतेच पुढारपण नाही, कोणत्याच विचारधारेचा प्रचार नाही, तरीही एक कार्यक्रम होत आहे. सामाजिक उपक्रम कसा राबवावा याचा जणू आदर्श वास्तूपाठच बाबूभाईंनी समाजासमोर ठेवला आहे.
यांचा झाला सन्मान
बाबूभाई व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा व इतर डॉक्टरांचा सत्कार केला. आज दिवसभर जे अपंग व रुग्ण प्रमाणपत्र काढण्यासाठी आले.त्यांना सर्व कागदपत्रे मोफत उपलब्ध करून दिली. तसेच यासर्व व्यक्तींना दिवसभर चहापाणी उपलब्ध करून दिले. त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भुंबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.