तथागत चौक ते पोखरी रस्त्याची मोठी दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:25+5:302021-08-01T04:31:25+5:30
रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांचा इशारा अंबाजोगाई : ...
रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन
किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांचा इशारा
अंबाजोगाई : शहरालगत असणारा अंबाजोगाई-पोखरी-सायगाव हा मुख्य रस्ता अंबाजोगाई येथून लातूरला जाण्यासाठी अतिशय जवळचा व कमी अंतराचा रस्ता असून, अंबाजोगाई येथील तथागत चौक ते पोखरी जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी दिला आहे.
या मुख्य रस्त्यालगत जोगाईवाडी परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी २ ते ३ किलोमीटर अंतरावर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची राहती घरे निर्माण झालेली असून वस्ती वाढतच आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जवळपास ४ ते ५ शाळा असून सदर शाळेला जा-ये करणारी लहान मुले, पालक, महिला शिक्षिका व कर्मचारी व तसेच लोकवस्तीतील शेकडो लहान मुले व पालक याच रस्त्याने ये-जा करतात. तसेच स्कूल बससुद्धा याच रस्त्याने जातात. त्याचप्रमाणे पोखरी या गावातील सर्व नागरिकांना अंबाजोगाई येथे जा-ये करण्यासाठी एकमेव हाच रस्ता आहे. तसेच अनेक शेतकरी बांधवांना शेतामध्ये जा-ये करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रोज हजारो वाहने चारचाकी, दुचाकी या रस्त्याने जा-ये करतात. एकूणच अंबाजोगाई ते पोखरी जाणाऱ्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी असंख्य व्यापारी व हजारो लोकांच्या दैनंदिन वाहतुकीचा वापर होत असून सदरचा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे.
येत्या पंधरा दिवसांमध्ये अंबाजोगाई ते पोखरी, तथागत चौक ते पोखरी या रस्त्याचे पक्के बांधकाम करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम होण्यासाठी प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी; अन्यथा जनआंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव, ॲड. सुधाकर सोनवणे, ॲड. सतीश घोगरे व परिसरातील नागरिकांनी निवेदनात दिला आहे. बीड जिल्ह्याचे मुख्यमंत्री, ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता नीला व अंबाजोगाई उपविभागाचे उपअभियंता श्रीधर फड यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
310721\img-20210731-wa0073.jpg
या रस्त्याचे काम लवकर व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले