पॅसेंजर रेल्वेला आजपासून हिरवा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:21 AM2021-07-19T04:21:55+5:302021-07-19T04:21:55+5:30
परळी : येथील रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या कोरोना संकटामुळे एक वर्ष होऊन गेले, तरी अद्याप सुरू झालेल्या ...
परळी : येथील रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या कोरोना संकटामुळे एक वर्ष होऊन गेले, तरी अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे परळी व परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. एक्स्प्रेस रेल्वे गाड्या स्पेशल म्हणून सुरू झाल्या असल्या, तरी पॅसेंजर रेल्वे गाड्या मात्र अद्याप सुरू केल्या नाहीत. मग काय पॅसेंजर रेल्वे गाड्यातून कोरोना पसरतो का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे, तर १९ जुलैपासून दोन पॅसेंजर रेल्वे सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या सुरू होईपर्यंत मात्र एक्स्प्रेसच्या प्रवासाचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना बसणार आहे.
महाराष्ट्र अनलॉक झाला असला, तरी अद्यापही पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे परळी येथून व्यवसाय व इतर कामासाठी परभणी, पूर्णा येथे रोज येणे-जाणे करणाऱ्याची, तसेच पंढरपूर, अकोला येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एक्स्प्रेस रेल्वे गाड्याने प्रवास केल्यास पॅसेंजर रेल्वे गाड्यांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
-----
परळी हे सिकंदराबाद झोनमधील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असल्याने परळीमार्गे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू न केल्याने गैरसोय होत आहे. या प्रकरणी शुक्रवारी रेल्वे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांची परळीत भेट घेऊन निवेदन दिले आहे.
राजेंद्र ओझा, भाजपा शहर उपाध्यक्ष.
-----
परळीहून पूर्णा येथे सासुरवाडीला जाण्यास पॅसेंजर रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे एक्स्प्रेसने जावे लागते. परिणामी, पॅसेंजरपेक्षा एक्स्प्रेसला तिकीट जास्त असल्याने खिशाला झळ बसत आहे.
- संदीप हालगे, रेल्वे प्रवासी परळी.
सुरू असलेल्या एक्स्प्रेस - स्पेशल ट्रेन
काकीनाडा - शिर्डी, शिर्डी-काकीनाडा, सिकंदराबाद-शिर्डी, शिर्डी-सिकंदराबाद, विजयवाडा-शिर्डी, शिर्डी-विजयवाडा, औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद , बंगळुरू-नांदेड, नांदेड-बंगळुरू, कोल्हापूर-धनबाद, धनबाद-कोल्हापूर, कोल्हापूर-नागपूर, नागपूर-कोल्हापूर, पनवेल-नांदेड, नांदेड-पनवेल
बंद पॅसेंजर गाड्या
आदिलाबाद-परळी, परळी-आदिलाबाद, अकोला-परळी, परळी-अकोला, निझामाबाद-पंढरपूर, पंढरपूर-निझामाबाद, मिरज-परळी, परळी-मिरज, पूर्णा-परळी, परळी-पूर्णा, हैदराबाद-पूर्णा, पूर्णा-हैदराबाद.
---
परळी रेल्वे स्थानक मार्गे सर्व पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होणार आहेत. १९, २० जुलैपासून या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
- जितेंद्र कुमार मीना, रेल्वे स्थानक प्रमुख, परळी.
----------