तलावामुळे डोंगर पट्ट्यात हरितक्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:24+5:302021-09-05T04:37:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत आहे. यंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे अरणवाडी साठवण तलाव पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ बनला आहे. पाच ते सहा गावांत अरणवाडी तलावामुळे हरित क्रांती होऊ पाहत आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून अरणवाडी साठवण तलावाचा निर्णय झाला. तलावाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून रखडले होते. तो यावर्षी पूर्ण झाला व पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्यांच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग ४५८ सी हा गेल्याने हा साठवण तलाव सर्वांचे आकर्षण ठरू लागला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान होऊ नये म्हणून पाटबंधारेकडून या तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. यानंतर पुन्हा कालव्याचे काम ‘जैसे थे’ करण्यात आले. त्यानंतरही तलाव भरल्याने पाणी सांडव्यावरून वाहू लागले. महामार्गावरून जाणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी हे आकर्षक पर्यटनस्थळच झाले आहे. या तलावामुळे चोरांबा अरणवाडी, थेटेगव्हाण, पहाडी पारगाव, ढगेवाडी, सोनीमोहा आदी गावातील शेतीला फायदा होणार आहे. यामुळे डोंगराळ जमीन ओलिताखाली येणार आहे. सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.
पर्यटनासाठी आकर्षण
अरणवाडी तलाव चोहोबाजूंनी डोंगर असल्याने निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. महामार्गही जवळून जात आहे. यामुळे पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. यामुळे हा सेल्फी पॉइंट ठरत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनादेखील सेल्फीचा मोह आवरत नाही. तलावामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होणार असल्याचे परिसरातील ग्रामस्थ बाळासाहेब चव्हाण म्हणाले.
040921\04bed_1_04092021_14.jpg