व्यथा कामगारांच्या; शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी जाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:55+5:302021-04-13T04:31:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा शहरात जाऊन कामाला लागले होते. कसे तरी पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोना वाढला. शासनाने लॉकडाऊन केले आणि पुन्हा हातावरचे काम गेले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.
राज्यात सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही होत आहेत. या कोरोनाची साखळी थांबविण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध घालून काही प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील कंपन्या, हॉटेल, दुकानांवर कामाला असणाऱ्या कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यांची शहरात उपासमार होत आहे. शहरात उपाशी राहण्यापेक्षा ते गावात परतत असल्याचे दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर सध्या कामगार परतीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसते.
मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या जास्त
कोरोना हा सर्वसामान्य लोकांसाठी कायम त्रासदायक ठरला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार होत असल्याने शेकडो कामगार गावी आले होते. काहींना तर वाहने नसल्याने पायपीट करून त्यांनी गाव गाठले होते. यात त्यांचे हाल झाले होते.
आता पुन्हा तीच वेळ आली आहे. दुसरे लॉकडाऊनही सुरू झाल्याने हातचे काम गेले आहे. शहरात कामासाठी आलेल्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे ते आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच गावाच्या दिशेने परतू लागले आहेत. बस, रेल्वे, खासगी वाहनांचा ते आधार घेतात.
बीड जिल्ह्यातील कामगार हे सर्वाधिक मुंबई, पुणे येथे कामासाठी गेलेले आहेत. परंतु आता तिथे हाताला काम नाही. त्यामुळे ते आता गावी येत आहेत. तेथे उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे येऊन जे काम मिळेल ते करण्याची तयारी ते दर्शवत आहेत. पोटापुरता रोजगार मिळाला तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केल्या.
हाताला कामच नाही
पुण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी आलो होतो. थोडी ढिल मिळाल्याने पुण्याला गेलो. आता पुन्हा हॉटेल बंद झाल्याने कामच नाही. पगारही बंद आहे. इतरांना जेवण वाढत होतो, आता आम्हालाच उपाशी रहावे लागत आहे.
मंगेश काळे, केज
शेतातील काम येत नाही
पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीसाठी गेलो होतो. २० हजारांची नोकरीही मिळाली. पण आता कंपनीच बंद असल्याने कामावर येऊ नका म्हणून सांगितले. त्यातच शेतातील कामही येत नसल्याने अडचण आहे.
बाबासाहेब पांढरे, बीड
हे दिवस पुन्हा येऊ नयेत रे बाबा...
कोरोनाच्या पहिल्या लाॅकडाऊनमध्ये खूप त्रास झाला. नंतर काही प्रमाणात सुरळीत झाले होते. आता पुन्हा तेच दिवस आले आहेत. परंतु मागील काही महिन्यात जे अनुभवले ते दिवस पुन्हा येऊ नयेत. शहरात उपाशी राहून जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जुन शिंदे, बीड
===Photopath===
120421\12_2_bed_5_12042021_14.jpeg
===Caption===
बीड बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी दिसत आहे.