रुग्ण सुरक्षिततेची हमी द्या, मगच आम्हाला हाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:16+5:302021-05-14T04:33:16+5:30
बीड : वेळेवर जेवण देत नाहीत. सर्वत्र घाण आहे. हातातील सलाईन संपल्यावर रक्त बाहेर येते तरी कोणी लक्ष देत ...
बीड : वेळेवर जेवण देत नाहीत. सर्वत्र घाण आहे. हातातील सलाईन संपल्यावर रक्त बाहेर येते तरी कोणी लक्ष देत नाही. औषधीही बाहेरून आणायला सांगतात. हे सर्व हाल थांबवा आणि आम्हाला आमचा रुग्ण सुरक्षित असल्याची हमी द्या, मगच आम्हाला बाहेर हाकला, असा संताप नातेवाइकांनी व्यक्त केला. आम्हाला कोरोना वॉर्डमध्ये जाण्याची आवड नाही. परंतु, तुम्ही फक्त सुविधा आणि उपचार चांगले द्या, आम्ही फिरकणार पण नाही, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये सध्या नातेवाइकांचा वावर वाढला आहे. यामुळे संसर्ग वाढत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. परंतु, अपवादात्मक वगळता हे सर्व नातेवाईक रुग्णांना औषधी देणे, ऑक्सिजन सिलिंडर पोहोचविणे, जेवण व पाणी घेऊनच आतमध्ये जात असल्याचे समाेर आले आहे. परंतु, बुधवारी विभागीय उपायुक्त बेदमुथा आले आणि सर्व यंत्रणेला धारेवर धरत नातेवाइकांना बाहेर हाकलण्यास सांगितले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळीच पोलीस अधीक्षक आर. राजा रुग्णालयात गेले आणि स्वत: दहा नातेवाइकांना बाहेर घेऊन आले. परंतु हे सर्व लोक ग्रामीण भागातून आलेले होते. कोणी जेवण आणले होते, तर कोणी पैसे घेऊन आले होते. परंतु, पोलिसांनी आपल्या खाकीचा दबाव टाकत त्यांना ताब्यात घेऊन तासभर पोलीस चौकीत आरोपीसारखे बसविले. त्यामुळै नातेवाईक संतापले होते.
एसपी साहेब! नुसते फोटो काढू नका....
पोलीस अधीक्षक आर. राजा हे कोरोना वॉर्डमध्ये राऊंड घेऊन आले. बाहेर चौकीसमोर एका महिलेने आपली कैफियत मांडली. साहेब, आम्ही विनाकारण येत नाहीत हो. आमच्या रुग्णाला खूप त्रास होत आहे. आम्ही सोबत असलो तरच उपचार होतात. तुम्ही येतात आणि फोटो काढून जातात. आम्हाला त्याचं काही नाही; पण यावर काही तरी करा... असे त्या महिलेने सांगितले. ती पूर्णवेळ बोलत असताना रडत होती. अधीक्षक राजा यांनी राजकीय लोकांसारखे आश्वासन देत संबंधिताला सांगतो, असे म्हणत बंद काचांच्या गाडीतून निघून गेले.
...तेव्हा तुमचे पोलीस कोठे होते?
अधीक्षक राजा यांनी यापूर्वी अनेकदा भेट देऊन गेटवर बंदोबस्त नियुक्त केला. परंतु हे अधिकारी, कर्मचारी पोलीस चौकीच सोडत नाहीत. गुरुवारी सकाळीही खुद्द अधीक्षक राजा यांनी वॉर्डमधून १० नातेवाइकांना बाहेर काढले. मग यावेळी नेमलेले पोलीस कोठे होते, ते करतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिलिंडर काय पोलीस घेऊन जाणार का?
काही नातेवाइकांशी संवाद साधला असता, आम्ही इकडे आवड आहे म्हणून येत नाहीत. मध्ये काहीच सुविधा नाहीत. कोणी लक्ष देत नाहीत. साधं जेवण पण कोणी वेळेवर देत नाही, म्हणून आम्हाला घरून सर्व घेऊन जावे लागते. ही वेळ येऊ देऊ नका. आमचा रुग्ण सुखरूप आणि सुरक्षित असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने द्यावा. मगच पोलिसांनी आम्हाला बाहेर हाकलावे. ऑक्सिजन सिलिंडर वॉर्डबॉय घेऊन जात नाहीत. सिस्टर आम्हालाच आणायला सांगतात. आम्हाला बाहेर थांबवायचे असेल तर पोलिसांनी ते पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी, अशा संतप्त प्रतिक्रिया काही नातेवाइकांनी व्यक्त केल्या.
काय म्हणतात सीएस, एसीएस...
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते म्हणाले, पूर्ण विश्वास दिला जाईल. वेळेवर उपचार आणि सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी विशेष दहा लोकांची नेमणूक करत आहे. तसेच वॉर्डबॉयच्या तक्रारी कमी करण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. तर अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड म्हणाले, जेवण वेळेवर देण्याच्या सूचना तुमच्यासमोर दिल्या आहेत. तसेच त्यांना मनुष्यबळ वाढविण्यास सांगितले आहे. सर्व सुविधा व उपचार मिळविण्यासाठी आणखी मनुष्यबळ वाढविले जाईल.
===Photopath===
130521\13_2_bed_12_13052021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्यासमोर आपली कैफियत मांडताना भावूक झालेली महिला दिसत आहे.