पीकविम्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:12+5:302021-05-13T04:34:12+5:30
बीड : खरीप हंगाम २०१९-२० मधील तूर, कापूस, भुईमूग, तीळ व तसेच १३ महसुली मंडळातील सोयाबीन पीक विम्याच्या ...
बीड : खरीप हंगाम २०१९-२० मधील तूर, कापूस, भुईमूग, तीळ व तसेच १३ महसुली मंडळातील सोयाबीन पीक विम्याच्या रकमेचे वाटप अद्याप झालेले नाही. यामुळे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले. ६० दिवसांच्या आत मंजूर पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना दिली नसेल तर व्याजासह ती रक्कम अदा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांचा आढावा मुंडे यांनी घेतला. शेती नुकसानीचे महसुली व कृषी कर्मचाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात यावेत किंवा त्याबरोबरीने विमा कंपनीने आपला एक प्रतिनिधी द्यावा, याबाबत कृषीमंत्री यांच्याकडेही बैठक घेऊन निर्णय झालेला आहे. याचेही अनुपालन व्हावे, असेही यावेळी मुंडे म्हणाले.
यावर्षी सीताफळ या पिकास देखील फळपीक विमा अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या वर्षीपासून सीताफळाचा पीकविमा भरता येणार आहे. दरम्यान, मार्च २०२१ अखेर जिल्ह्यात १३ हजार ६०० वीज पंपांची वीज जोडणी प्रलंबित आहे, यापैकी जवळपास ४ हजार ५०० जोडणीचा खर्च ऊर्जा विभागाकडून प्राप्त होणे बाकी आहे. यासाठी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल. महावितरणने सब डिव्हिजननिहाय वीज जोडणीसाठी कृती कार्यक्रम तयार करावा. प्रलंबित असलेले नवीन कनेक्शन पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावेत अशा सूचना मुंडे यांनी केल्या.
यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे (व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे), आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय कृषी संचालक एल.डी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा उपनिबंधक फडणीस, यांच्यासह कृषी, महसूल, बँका, महावितरण, महाबीज, भारतीय पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
भरारी पथकांनी कारवाई करावी
जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले बियाणे, शिल्लक असलेले खते या सर्वांचा धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यावर्षी कुठेही बियाणे किंवा खतांची टंचाई भासणार नाही. याचे सूक्ष्म नियोजन करण्याबाबत मंत्री मुंडे यांनी सूचित केले आहे. जुनी शिल्लक खते ही जुन्या भावानेच विक्री व्हावीत. लॉकडाऊनच्या काळात साठेबाजी किंवा चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
१६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
खरीप हंगाम २०२१ साठी बीड जिल्ह्यात १६०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन कर्ज मागणारे शेतकरी यांना कर्ज दिले जावे, लॉकडाऊनमुळे कर्ज प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव यांच्यामार्फत कर्जाचे अर्ज देणे व अर्ज व आवश्यक कागदपत्रे संकलन करणे अशी गावस्तरावरून प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
...
फोटो ओळी..
बांधावर खते-बियाणे वाहनाला हिरवा झेंडा
आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे, कृषी संचालक एल.डी जाधव, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते आत्मा कार्यालय, कृषी विभाग बीड यांनी सुरू केलेल्या बांधावर खते व बियाणे पुरवठा या मोहिमेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
...
===Photopath===
120521\12_2_bed_16_12052021_14.jpg
===Caption===
बैठकीपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे, कृषी संचालक एल.डी जाधव, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते आत्मा कार्यालय, कृषी विभाग बीड यांनी सुरू केलेल्या बांधावर खते व बियाणे पुरवठा या मोहिमेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.