पालकमंत्र्यांची राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणास भेट; आंदोलकांची मागणी पूर्ण होईपर्यंत माघार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 12:13 PM2021-12-27T12:13:30+5:302021-12-27T12:14:01+5:30
येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, अअसा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला
परळी ( बीड ) : बार्टीतर्फे देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती-२०१८ एम.फिल. ते पीएच.डी. पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी, या मागणीकरिता संपूर्ण राज्यातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी परळीत शुक्रवारपासून साखळी उपोषणास बसले आहेत. रविवारी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांचे मत त्यांनी जाणून घेतले. मात्र, त्यानंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच.डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी)च्या माध्यमातून देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे. पीएच.डी.पर्यंत सलग अधिछात्रवृत्ती देण्यात येत नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागेल. यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधन अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यासाठी परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू केले. मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यास दिले आहे.
या आंदोलनात नारायण खरात, अक्षय जाधव, अमोल घुगे, भागवत चोपडे, भीमराव वाघमारे, संदीप तुपसमुद्रे, श्रद्धा सिरसाट, दीक्षा ढगे, सारिका दळवी, प्रीतम मोरे, अनिता शिंदे, उषा इंगळे, सविता गंगावणे, अमोल शिंदे, प्रमिता भोजने यांच्यासह अनेक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रविवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन चर्चा केली. मात्र, उपोषणार्थींचे समाधान झाले नाही. यामुळे मुंडे गेल्यानंतर उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
..तर बेमुदत उपोषण करणार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी उपोषणाला भेट दिली. मात्र, त्यांनी मागणीचा विषय ऐकून घेतला नाही. उपोषणाला महत्त्व नसल्यासारखा त्यांनी वेळ दिला नाही. विद्यार्थ्यांप्रती त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आम्हाला मंत्री धनंजय मुंडेच न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही त्यांच्या परळीत उपोषणाला बसलो आहोत. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असे श्रद्धा शिरसाठ, नारायण खरात यांनी सांगितले.