गुढीपाडव्याला दुकाने बंदचा मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:29+5:302021-04-15T04:31:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर, आदी दुकाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सलग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर, आदी दुकाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सलग दुसऱ्यावर्षीही बंद राहिल्याने संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तर ग्राहकांचे खरेदीचे स्वप्नही बारगळले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांना लॉकडाऊनचा फटका बसला तर व्यवसाय बंद राहिल्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना सलग दुसऱ्यावर्षीही बसल्याने बाजारपेठेतील आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्या दिवशी होतो. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा समजला जातो. या दिवसाला विशेष महत्त्व असल्याने बहुतांश ग्राहक नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी गुढीपाडव्याला पसंती देतात. या निमित्ताने बाजारपेठेतही ग्राहकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. या माध्यमातून बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, सलग दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुकाने बंद राहिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला. बाजारपेठेतील उलाढालीवर याचा मोठा परिणाम झाला. मोठा आर्थिक फटका बसल्याने व्यावसायिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दे चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर, कपड्यांची दुकाने व विविध व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. इतरवेळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारी ग्राहकांसाठी विविध योजना, लकी ड्राॅ, आकर्षक भेट योजना असे विविध उपक्रम राबवत असतात. मात्र, सलग दोन वर्ष गुढीपाडव्याचा मुहूर्त व्यापाऱ्यांसाठी फोल ठरला. त्यामुळे पुन्हा बाजारपेठेत आर्थिक मंदीची लाट आली आहे.