ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:05+5:302021-04-25T04:33:05+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा ...

Guidance from Gram Panchayat | ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

Next

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा, काय काळजी घ्यायची, कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना सांगितल्या जात आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप घोणशीकर यांनी दिली.

फळांना मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिक्कू, नारळपाणी या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. द्राक्ष ६० रुपये तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या उष्णतेने थंडावा मिळावा म्हणून ग्राहकांकडूनही फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.

पाण्याचा अपव्यय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक आपले पाणी भरून झाल्यानंतर आपला नळ बंद न ठेवता ते पाणी वाहून जाते. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नागरिकांनी पाणीबचतीचे महत्त्व समजून घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा.

बंदचा रिक्षा व्यवसायाला फटका

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद राहिली. याचा परिणाम म्हणून रिक्षाचालकांना बेरोजगार व्हावे लागले. सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीतच सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसायही होत नाही. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही रिक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

वृद्ध कलावंतांना मानधन द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात वृद्ध कलावंतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना ही योजना लागू आहे, अशा कलावंतांचे माानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. तर, ज्या नवीन कलावंतांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांच्या प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. अशा कलावंतांना तत्काळ मानधन सुरू करा, अशी मागणी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ कलावंत उल्हास पांडे यांनी केली आहे.

Web Title: Guidance from Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.