गावोगावी कृषी विभागाकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:38+5:302021-06-05T04:24:38+5:30
विविध बांधकाम वाळू अभावी ठप्प वडवणी : कोरोनाच्या संसर्ग पाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुलांची कामे ...
विविध बांधकाम वाळू अभावी ठप्प
वडवणी : कोरोनाच्या संसर्ग पाठोपाठ प्रशासकीय उदासीनतेमुळे शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुलांची कामे ठप्प आहेत. वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरातील विविध योजनेचे घरकूल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे घरकूल बांधकाम करताना वाळूची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना बांधकाम बंद ठेवावी लागली. घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
डिझेल दरवाढीचा शेती मशागतीला फटका
वडवणी : दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्याने मशागतीची कामे करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रतिलिटर डिझेलचे दर ९३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे मशागतीचे दरही पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. शेती मशागतीसाठी सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पावसाळ्यापूर्वी मशागतीला सुरूवात झाली आहे.
ना मास्क,ना सोशल डिस्टन्स
वडवणी : शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागरिकांच्या मनात भीती राहिली नाही. दोन दिवसापासून शहरातील बाजारपेठेत नागरिकांची बिनधास्त वर्दळ पाहावयास मिळत आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानात ना सोशल डिस्टन्स, ना मास्क,असे चित्र सध्या आहे. लोकांनी कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे,अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. दुकानदारांनी येणाऱ्या ग्राहकांना कोविड नियमावलीनुसार प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी
वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊन जाहीर केला असल्याने जनावरांचे बाजार बंद असल्याने थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मशागतीस बैल जोडी आवश्यकता असते. सध्या डिझेल दरवाढीचा शेती मशागतीस फटका बसत असल्याने बैलांच्या साह्याने मशागतीस पसंती दिली जात आहे. जनावरांचे बाजार अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल, गाय, म्हैस, शेळ्या खरेदी-विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.