दु:खाची काजळी विसरून जीवनात रंग भरण्यासाठी टाकतात गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:22 AM2021-03-29T06:22:24+5:302021-03-29T06:22:36+5:30
मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे.
- अनिल भंडारी
बीड : मनभेद, मतभेद विसरत रंगांची उधळण करीत होळीचा सण सर्वत्र आनंद आणि जल्लोषात साजरा केला जातो. मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे. यंदा कोरोनामुळे अडचणी असल्यातरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत यंदाच्या धुलिवंदनाला साधेपणाने रंग भरले जाणार आहेत.
व्यापार, उद्याेगासाठी मागील ६०-६५ वर्षांपासून सिंधी पंजाबी समाज इथल्या मातीत मिसळला आहे. सर्वधर्मीय सण , उत्सवात सहभागी होणाऱ्या सिंधी- पंजाबी बांधवांनी आपल्या समाजाची परंपरादेखील जपली आहे. शहरात या समाजाची ५० ते ६० घरे असून लोकसंख्या ७०० च्या घरात आहे. येथील गुरूनानक दरबारात समाजाचे सर्व उपक्रम, जयंती, उत्सव तसेच इतर कार्यक्रम एकोप्याने पार पडतात. वर्षभरात ज्यांच्या घरी दु:ख झाले,
घरातील व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन किंवा सामुदायिक कार्यक्रमात बोलावून या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली जाते. नंतर त्या कुटुंबीयांवर गुलाल टाकून आनंदात सहभागी होण्यासाठी विनवणी केली जाते. त्यानंतर हे कुटुंब समाजातील सर्व प्रसंगात सहभागी होतात, असा रीतीरिवाज आहे. बीड शहरामध्ये गेल्या २५ वर्षांपासून हा रिवाज पाळला जातो.