गुंडाचा पोलिसांवर हल्ला; चौकात पकडून दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:21 AM2019-06-11T00:21:33+5:302019-06-11T00:22:29+5:30
शहरातील तुळजाई चौकात पोकलेन जाळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गणेश थोरात (रा.बीड) या अट्टल गुन्हेगाराने हल्ला केला.
बीड : शहरातील तुळजाई चौकात पोकलेन जाळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गणेश थोरात (रा.बीड) या अट्टल गुन्हेगाराने हल्ला केला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भर चौकात चोप दिला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडला. थोरातवर खून, लुटमार, खंडणीसारखे विविध १७ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बीड पालिकेतर्फे सुरु असलेल्या भूमिगत नालीचे काम रोखून धरत पोकलेनवर दगडफेक केल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणात संशयित गणेश थोरातला अटक करण्यासाठी सोमवारी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस गेले होते. याच दरम्यान त्याने नेहमीप्रमाणे पोलिसांवर हल्ला केला. ही बाब कर्मचाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी फौजफाट्यासह धाव घेत गणेशला एका शासकीय वसतिगृहातून ताब्यात घेतले. चौकात आणून त्याला चांगलाच चोप दिला. त्याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बीड शहरात दहशत
गणेश थोरात हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा, हल्ला आदी गंभीर स्वरूपाची गुन्हे आहेत. त्याची बीड शहरात दहशत होती. ज्या परिसरात त्याची जास्त दहशत होती, त्याच परिसरात कबाडे यांनी त्याची धुलाई केली.