शिरुर तालुक्यात शंभर ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:21+5:302021-09-26T04:36:21+5:30
शिरुर कासार : तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे व दलदलीचा परिणाम हा डासांना पोषक ठरत असल्याने थंडीतापाचा आजार जोर धरत ...
शिरुर कासार : तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे व दलदलीचा परिणाम हा डासांना पोषक ठरत असल्याने थंडीतापाचा आजार जोर धरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक डास निर्मूलन मोहीम सुरू केली असून डासांचा नायनाट करण्यासाठी तालुक्यात शंभर ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र उभारले आहेत. शिरूर प्रा.आ.केंद्रांतर्गत १३ तर खालापुरी अंतर्गत ८७ पैदास केंद्र उभारले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली तसेच आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
शिरुर,खालापुरी व रायमोह प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व आशासेविका या मोहिमेत सहभागी असून गावागावात व घरोघरी फिरून पाणीसाठे तपासले जात आहेत. डासांचा मागमूस जरी दिसून आला की ते पाणी ओतून दिले जाते. नव्याने पाण्यात अबेटिंग करून गप्पी माशांची पिळावळ सोडली जात आहे. यामुळे डासांची पैदास थांबणार असून थंडी, ताप या रोगांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे. पाणी साचून राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे जरुरी असल्याचे सांगण्यात आले.
या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खाडे, डॉ.सुहास खाडे व डॉ. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक थिगळे,नागरे, जोगदंड,आरोग्यसेवक शिंदे, नारायण सानप,साजिद शेख,पी. के. सानप व आशासेविका या मोहिमेत काम करत आहेत.
तालुक्यातील नगरपंचायत व सर्व ग्रामपंचायतींना औषध व धूर फवारणीबाबत पत्र दिले होते; मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. आरोग्याची बाब असल्याने संबंधित नगरपंचायत , ग्रामपंचायतीने औषध, धूर फवारणीसह तणनाशक फवारणी करावी तसेच प्रत्येक कुटुंबाने एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी, शिरुर कासार
250921\img-20210925-wa0023.jpg
फोटो