शिरसदेवीत गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह गावठी कट्टा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:39 AM2018-10-29T00:39:56+5:302018-10-29T00:42:37+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील शिवनेरी ढाब्यावर धाड टाकून गोवा बनावटीची तसेच देशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत साडेतीन लाखाच्या आसपास जाते.
राष्टÑीय महामार्ग २२२ लगत असलेल्या हॉटेल शिवनेरी (ढाबा) शिरसदेवी (ता.गेवराई) येथे राम संदीपान कदम हा अवैधरीत्या देशी, विदेशी दारू चोरट्या पद्धतीने विक्री करतो, अशी बातमी मिळाल्यावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कर्मचाऱ्यांसह सदर ढाब्यावर धाड टाकली. यावेळी राम कदम हा सदर ठिकाणाहून पळून गेला. सदर ढाब्याची झडती घेतली असता तेथे देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने ठेवल्या असल्याचे निदर्शनास आले. ढाब्यासमोर पांढ-या रंगाची कार (एमएच १४ बीएक्स ५२४४) उभी असल्याचे दिसून आले. सदर वाहनाची झडती घेतली त्याच्या डिकीत १८० मिलीच्या देशी दारुच्या संत्रा ब्रँडच्या ५० सीलबंद बाटल्या व १८० मिलीच्या ब्रँडीच्या ९ सीलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर ठिकाणी संशय बळावल्याने तसेच शिवनेरी ढाब्याचा चालक राम कदम हा फरार झाल्याने त्याच्या राहत्या घरी शोध घेऊन झडती घेतली असता घरात ६५० मिली क्षमतेच्या बिअरच्या ४४ बाटल्या मिळून आल्या. तसेच एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आरोपीच्या घरी मिळून आल्या. सर्व देशी, विदेशी दारू, बिअर, चारचाकी वाहन व देशी कट्टा असा एकूण ३ लाख २५ हजार ५४० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन राम कदम याच्याविरुद्ध महाराष्टÑ दारुबंदी कायदा १९४९ चे कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कदम याच्या घरातून जप्त करण्यात आलेली गावठी पिस्टल पुढील कार्यवाहीकरीता तलवाडा पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आलेली आहे.
- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तपासात आश्रुबा गाडे याच्या शिरसदेवी येथील राहत्या घरी छापा मारला असता तेथून आश्रुबा गाडे व परमेश्वर जाधव यांच्या ताब्यातून विदेशी ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ७३ बाटल्या, व्हिस्की विदेशी ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ बाटल्या व व्होडकाच्या १८० मिली क्षमतेच्या २६ बाटल्या असा एकूण २९ हजार ७८८ रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. या दोघांविरुद्ध महाराष्टÑ दारुबंदी कायदा १९४९ चे कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, महाराष्टÑ राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा आरोपींनी कुठून आणला याबाबत अधिक तपास सुरू आहे. अवैध व बनावट दारु विक्री करणा-या इसमांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवून महसूल संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले.