तासिका तत्त्वावरील गुरुजी शेतमजुरीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:12+5:302021-09-09T04:40:12+5:30
बीड : राज्यात हजारो सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असताना गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदाच्या १८ हजार ...
बीड : राज्यात हजारो सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असताना गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदाच्या १८ हजार जागा रिक्त आहेत आणि याच्या उलट हजारो पात्रताधारक तरुण उमेदवार बेरोजगार आहेत. तासिका तत्त्वावर अनेक प्राध्यापक काम करीत आहेत. कमी मानधनामुळे अनेकांना मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे.
पीएच.डी., नेटसेट झालेले तासिका तत्त्वावरील प्राध्यापक शेतमजुरीवर किंवा पर्यायी रोजगार शोधत आयुष्याची कसरत करीत आहेत. विद्यमान असो अथवा मागील राज्य सरकार प्रत्येक वर्षी आम्ही जागा रिक्त पदे भरू, अशी पोकळ आश्वासने देऊन या तरुणांना झुलवत ठेवले आहे. मात्र, आता हे तरुण या आश्वासनांना कंटाळून गेल्या दीड महिन्यापासून पुणे येथील उच्च शिक्षण आयुक्ताच्या कार्यालयापुढे उपोषणास बसले आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी या तरुणांची आहे. सरकारला जागा भरायच्या नसतील, तर मानधनात भरघोस वाढ करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
किती दिवस जगायचे असे?
मी १० वर्षांपासून तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करतोय. नऊ ते दहा महिने अध्यापनातून निव्वळ ४० ते ५० हजार हाती पडतात. महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर जगायचं कसं? कोरोनाकाळात वर्षभर मी शेतात राबलो. सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना स्वाभिमानाने जगता यावे, इतपत मानधनवाढ करावी. - डॉ. महेश वाघमारे, बीड
----------
मागील १० वर्षांपासून तासिका तत्त्वावरील काम म्हणजे निव्वळ गुलामी वाटते. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या उच्चशिक्षित नोकरीतून भागवू शकत नाही, म्हणून शिकवणीवर्गापासून ते शेतीतील मोलमजुरी करून पोटाला चिमटे देत जगत आलो आहोत. शासनाने आता तरी सेट, नेट, पीएच.डी.धारकांचा अंत पाहू नये. - डॉ. महादेव जगताप, बीड
---------
उच्चविद्याविभूषित होऊनदेखील आज माझ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण होत नाहीत. भाऊ, मित्र, नातेवाइकांच्या सहकार्याने परिवाराचा उदरनिर्वाह चालू आहे. मृत्यूपेक्षा हे जीवन भयंकर आहे. माझ्यासारखे असंख्य तरुण आज, उद्या जागा निघतील आणि आपण प्राध्यापक होऊ, अशी आशा घेऊन जगत आहेत. - बाबासाहेब जावळे, बीड
---------
सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
राज्यात प्रत्येक वर्षी सेट-नेट आणि पेट परीक्षा होत आहेत. हजारो पात्रताधारक उमेदवार नव्याने तयार केले जात आहेत. सेट-नेट आणि पीएच.डी.धारक उमेदवारांची संख्या वाढत आहे. गेल्या १० वर्षांपासून मागील व सध्याच्या सरकारनेही सहायक प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली आहे. यामुळे काही पात्रताधारक उमेदवारांना तासिका तत्त्वावर अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.
------------
१० वर्षांपासून लटकला प्रश्न
दहा वर्षांपासून हा प्रश्न रखडल्याने काही पात्रताधारक शेतात मजुरी करत आहेत, काही जण तर अगदी भाजीपाला, फळविक्री यासारखी कामेसुद्धा लाज सोडून करत आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करून ज्या तरुणांनी प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्यावर अशी वेळ यावी, हे या व्यवस्थेचं अपयश असल्याचे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक सांगतात.
-------