सुनावणीसाठी आलेले गुरुजी दिवसभर ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:51 AM2019-01-04T00:51:54+5:302019-01-04T00:54:35+5:30
आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे लागले.
उच्च न्यायालयाचा निर्णय व शासनाच्या निर्देशानुसार बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले. दुसºया दिवशी या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी या शिक्षकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात ३ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली होती.
सकाळपासून हे शिक्षक जिल्हा परिषदेत आले होते. मात्र दुपारी चार वाजेपर्यंत ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्रा. ) राजेश गायकवाड यांनी सुनावणी घेतली. कार्यमुक्त केल्यानंतर उपोषणार्थी शिक्षकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ३९ मुद्दे मांडले होते. या मुद्द्यांवर या वेळी शिक्षकांनी त्यांची बाजू मांडली.
या मुद्द्यांवर झाली सुनावणी
आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बीडमध्ये रुजू होऊन ५ वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांना नियमित पगार सुरु आहे.
सध्या जि. प. कडे १५३ जागा रिक्त आहेत. पुढील दोन वर्षात पदोन्नतीने व सेवानिवृत्तीने जवळपास ५०० ते ७०० जागा रिक्त होत आहेत. टप्प्या टप्प्याने रिक्त होणाºया जागा मुळ प्रवर्गास उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनात केली होती. सदोष बिंदू नामावली असताना कार्यमुक्तीची कारवाई करताना सर्व शिक्षकांना विश्वासात घेतले नाही. प्रगटनातील व प्रसिद्धीपत्रकातील तारीख, वेळ पुरेशी नसल्याने व तफावत असल्याने ही कारवाई एकतर्फी झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. १९९५-९६-९७ मध्ये तयार केलेल्या बिंदू नामावलीत वंजारी, धनगर, बंजारा समाजातील शिक्षक हे खुल्या प्रवर्गातून निवड झालेले असताना २०१४, २०१५, २०१६ व २०१८ या बिंदू नामावलीत काही शिक्षकांना एनटी प्रवर्गात दाखविले आहे. यात दुरुस्ती केलेली नाही.
२०१३, २०१४ मध्ये अतिरिक्त शिक्षक होते तर २०१६ व २०१७ मध्ये दोन्ही वर्षात आॅनलाईन पद्धतीने शिक्षक बदली करुन आले ते यादीत नाहीत.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बीड जि. प. मध्ये दाखल झाले, मग यात त्यांचा दोष काय? असे उपोषणार्थी शिक्षकांचे म्हणणे होते.