बिअरबारसमोर गुरूजींचा राडा; मुख्याध्यापकावर बतईने हल्ला, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
By सोमनाथ खताळ | Published: March 14, 2024 07:25 PM2024-03-14T19:25:12+5:302024-03-14T19:27:03+5:30
याप्रकरणी या दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर बतईने प्राणघातक हल्ला केला. ही घटना १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी जवळील एका बिअरबारसमोर घडली. यातील जखमी मुख्याध्यापकावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी या दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
अंबादास मल्हारी नारायणकर (वय ५३ रा.विश्वासनगर, बीड) हे गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांच्यासह सहशिक्षक घाडके, रघुनाथ नागरगोजे, लक्ष्मण परजणे, संतोष गिरी हे बीडवरून शाळेत दररोज एकाच गाडीत जातात. १२ मार्च रोजीही ते नेहमीप्रमाणे शाळेत गेले. शाळा सुटल्यावर परत बीडला निघाले. यावेळी हे सर्वजण मादळमोही येथील हॉटेल गौरी बिअर बारमध्ये जेवणासाठी गेले. तेथे आचारी नव्हते. परंतू याच दरम्यान त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. यामुळे नारायणकर हे पाडळसिंगी रोडवर येऊन उभा राहिले.
यावेळी इतर चारही शिक्षक एका गाडीतून त्यांच्याकडे आले. चारचाकी गाडी त्यांच्या पायावर घालून जखमी केले. त्यानंतर संतोष गिरी याने नारायणकर यांच्या भूवईवर बतईने हल्ला केला. तर रघुनाथ नागरगोजे याने जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यात जखमी झालेले मुख्याध्यापक नारायणक हे इतरांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर सध्या वॉर्ड क्र. ५ मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गिरी व नागरगोजे या दोन सहशिक्षकांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.