परळीत पकडला ३० लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:17 AM2018-03-15T00:17:28+5:302018-03-15T00:17:38+5:30
अंधाराचा फायदा घेऊन बीडकडे २० पोती गुटखा घेऊन निघालेला टेम्पो अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील टोकवाडीजवळ करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : अंधाराचा फायदा घेऊन बीडकडे २० पोती गुटखा घेऊन निघालेला टेम्पो अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील टोकवाडीजवळ करण्यात आली. यामध्ये जवळपास ३० लाख रूपयांचा गुटखा व टेम्पो जप्त केला आहे. चालकाने मात्र अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मागच्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
परळीहून बीडकडे एका टेम्पोतून (एमएच २५ यू १०४९) गुटखा जात असल्याची माहिती बोºहाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक पाठवून सापळा लावला. टोकवाडीजवळ टेम्पो येताच पथकाने तो अडविला. पोलीस पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. त्यानंतर तपासणी केली असता टेम्पोत तब्बल २० पोते गुटख्याने भरलेले दिसून आले. हा सर्व मुद्देमाल जप्त करून परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर अन्न व प्रशासनाला माहिती देण्यात आली.
पंचनामा झाल्यावर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल, असे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.नरहरी नागरगोजे, सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, सचिन सानप यांनी केली.
तिसरी मोठी कारवाई
मागील काही दिवसांपासून गुटखा पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, माजलगावात उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी धाडसी मोठ्या कारवाया केल्यानंतर मंगळवारी रात्री अजित बोºहाडे यांच्या पथकाने तब्बल ३० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला.
आरोपी पळाल्याने कारवाई रखडणार
सदरील प्रकरणात आरोपीने अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार पंचनामा आणि गुटख्याचा नमुना घेण्यासाठी आरोपी असावा लागतो. पोलिसांच्या मदतीने ते घेता येत नाही.
आरोपी असेल तरच नुमना तपासणीसाठी घेता येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले. जोपर्यंत आरोपी हजर होत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नसल्याचेही केरूरे यांनी सांगितले. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांना आता आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ धावाधाव करावी लागणार आहे.