शेडमध्ये लपविलेला गुटखा जप्त, पटांगणातील जुगारावरही धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:31+5:302021-05-28T04:25:31+5:30
अंबाजोगाई : शहर पोलिसांनी शहरालगतच्या एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपविलेला २० हजारांचा गुटखा जप्त करून एकास ताब्यात घेतले. तर, ...
अंबाजोगाई : शहर पोलिसांनी शहरालगतच्या एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपविलेला २० हजारांचा गुटखा जप्त करून एकास ताब्यात घेतले. तर, दुसऱ्या कारवाईत फॉलोअर्स क्वार्टर भागात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारून सात जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अंबाजोगाईतील राधानगरीलगतच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याची चोरीछुपे विक्री होत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गोपाळ सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी नागरगोजे, येलमाटे, आवले यांनी पत्र्याच्या शेडवर छापा मारला. या वेळी त्या ठिकाणी शिवाजी प्रल्हाद बुलबुले (रा. लातूर, ह.मु. प्रशांत नगर, अंबाजोगाई) हा व्यक्ती गुटख्याची विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १९ हजार ९२० रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी शिवदास केदार यांच्या फिर्यादीवरून शिवाजी बुलबुले याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी फॉलोअर्स क्वार्टर भागातील पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. या ठिकाणी एका घराच्या शेजारी पटांगणात पत्त्याचा क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस कर्मचारी येलमाटे, मडोळे यांनी सदर क्लबवर छापा मारला असता, तेथे अन्सार अकबर काझी, संजय उत्तमराव लामतुरे, लतीफ महेबूब बागवान, नीलेश रमेश काळे, राहुल चंद्रकांत कदम (सर्व रा. अंबाजोगाई), तुकाराम मंचकराव भगत, गोविंद विक्रमराव जाधव (दोघेही रा. वाघाळा) हे सात जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बळीराम मडोळे यांच्या फिर्यादीवरून सातही जुगाऱ्यांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.