महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेला साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:40 AM2018-10-16T00:40:04+5:302018-10-16T00:41:27+5:30
कर्नाटक राज्यातील हुमनाबाद महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटखा अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाने घाटनांदूर जवळ पकडला. यावेळी गुटखा आणि ट्रक असा ३२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कर्नाटक राज्यातील हुमनाबाद महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटखा अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाने घाटनांदूर जवळ पकडला. यावेळी गुटखा आणि ट्रक असा ३२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक दादाराव वाघमारे, कर्मचारी नागरगोजे आणि मस्के हे शनिवारी दुपारी एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त परळीकडे निघाले होते. त्यांना घाटनांदूर रेल्वे पटरीच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ एक टेम्पो (एमएच ०३ सीपी ४२५४) संशयास्पद अवस्थेत आढळून आला. संशय बळावल्याने झडती घेतली असता २२ लाख ५० हजार रुपयांच्या गोवा गुटख्याचे ५० पोते आढळून आले. पोलिसांनी टेंपो चालक जगदीश रामचंद्र गौडा (रा. बेंगलोर) आणि बबलू सालम शेख (रा. मुंबई) या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. सदरील गुटखा महाराष्ट्रातच कुठेतरी द्यायचा आहे, मात्र तो कोणी पाठविला आहे व कोणाकडे द्यायचा आहे याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण पोलिसांनी पत्राद्वारे माहिती दिल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश रमेश मरेवार यांनी अंबाजोगाईत येऊन गुटखा ताब्यात घेतला. याप्रकरणी रामचंद्र गौडा, बबलू सालम शेख आणि टेम्पो मालक फरीद शमशुद्दीन शेख (रा. मुंबई) या तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.