मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:09 PM2023-03-15T15:09:25+5:302023-03-15T15:10:06+5:30
यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले.
परळी (बीड) : मध्यप्रदेशातील इंदूरमधून परळीत विक्रीसाठी आलेला 33 लाख रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला व गुटखा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी- गंगाखेड रस्त्यावर केली. पोलिसांनी टेम्पोसह एकूण 51 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून हरियाणाचा रहिवासी असलेल्या चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका टेम्पोमध्ये ( एच आर 69 डी 2302) राज्यात बंदी असलेला राजनिवास गुटख्याचा माल परळी - गंगाखेड रोडवर उतरवला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने गंगाखेड रोडवर मध्यरात्री सव्वाबारा वाजता छापा मारला.
यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी मध्यप्रदेशहून आलेल्या टेम्पोची तपासणी केली. यावेळी चालक साबेर सौंदाना सुन्नी ( रा. सुनेडा तालुका पुनाना राज्य हरियाणा ) याने गुटखा आणि पानमसाला इंदूर येथून आणल्याचे सांगितले. पोलिसांना गुटख्याचे 69 मोठे पोते व सुगंधी तंबाखूचे 14 मोठे पोते असा एकूण 33 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. गुटखा आणि टेम्पो असा एकूण 51 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी आठ आरोपी विरोधात सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादी वरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, जमादार बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गीते, विकास चोपणे यांनी केली आहे.