७ ग्रामीण रुग्णालयांचा प्रसुतीला आखडता हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:18 PM2020-02-26T23:18:59+5:302020-02-26T23:19:32+5:30
एक दोन शस्त्रक्रिया किंवा प्रसुती केल्यानंतर आरोग्य विभागाकडून गाजावाजा केला जातो. परंतु सरासरी काढली असता जिल्ह्यातील धानोरा, आष्टी, नांदुरघाट, तालखेड, पाटोदा, रायमोहा, चिंचवण या सात ग्रामीण रुग्णालयांची कामगिरी अतिशय खराब असल्याचे समोर आले आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एक दोन शस्त्रक्रिया किंवा प्रसुती केल्यानंतर आरोग्य विभागाकडून गाजावाजा केला जातो. परंतु सरासरी काढली असता जिल्ह्यातील धानोरा, आष्टी, नांदुरघाट, तालखेड, पाटोदा, रायमोहा, चिंचवण या सात ग्रामीण रुग्णालयांची कामगिरी अतिशय खराब असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांच्या नावाखाली वर्षाकाठी लाखो रूपयांची उधळपट्टी या रुग्णालयांवर केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयासह एक स्त्री रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि ९ ग्रामीण रुग्णालये आहेत. अपवादात्मक संस्था वगळता सर्वत्र पुरेसे मनुष्यबळ आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञ अथवा परिचारीकांचा पदे रिक्त आहेत, अशा ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्यात आली. त्यांच्या वेतनावर प्रत्येक महिन्याला लाखो रूपये खर्च केले जातात. मनुष्यबळ असतानाही सेवा देण्यात आरोग्य विभाग अद्यापही पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. त्यातच प्रसुतीसाठी तर ग्रामीण रुग्णालये हात वर करीत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ३६ हजार ८२३ प्रसुती झाल्या. यात १० हजार ४६६ सीझर आहेत. एकूण काम पाहिले तर बीड जिल्ह्याचे काम कौतुकास्पद आहे. परंतु बीड जिल्हा रुग्णालय, गेवराई, केज व परळी उपजिल्हा रुग्णालये आणि माजलगाव व धारूर ग्रामीण रुग्णालयांचे काम सोडले तर इतरांचे काम अतिशय खराब आहे. धानोरा, तालखेडला तर महिन्याकाठी केवळ ३ आणि चिंचवणला केवळ सहाच प्रसुती होत असल्याचे समोर आले आहे. इतरांप्रमाणेच येथेही निधी खर्च केला जातो. परंतु केवळ इमारतीचे कारण सांगत येथे प्रसुती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
शल्य चिकित्सकांकडून याकडे दुर्लक्ष
ज्या ठिकाणी काम चांगले आहे, अशाच ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात भेटी देतात. परंतु खराब कामगिरी असलेल्या आरोग्य संस्थांचे काम सुधारण्याबाबत उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरले आहेत. धानोरा २ आणि चिचंवणला केवळ एकच सीझर झाले आहे.
पहिले सीझर झाल्यावरच याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. नंतर त्यात सातत्य का राहिले नाही? याचा आढावा मात्र, अद्यापही घेतला नसल्याचे सांगण्यात आले.
केज उपजिल्हा रुग्णालय अव्वल
दिलेल्या उद्दीष्टापेक्षा केज उपजिल्हा रुग्णालयाचे काम तिपटीने आहे. येथे आतापर्यंत सरासरी ३६३ टक्के काम झाले आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम २३६ टक्के, गेवराईचे १८७ टक्के, परळीचे १११ टक्के, माजलगावचे १२२ टक्के आणि धारूरचे ९० टक्के काम आहे. इतर ग्रामीण रुग्णालयात मात्र, महिन्याकाठी आष्टी सोडले तर २० ही प्रसुती होत नाहीत.