विरोधकांना माझेच म्हणायची सवय, आम्ही खोटे दावे करत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:39+5:302021-01-20T04:33:39+5:30
आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल ...
आष्टी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आष्टी मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या समर्थकांना कौल दिला आहे; परंतु काही विरोधक खोटे बोल, पण रेटून बोल याप्रमाणे दिशाभूल करणारे आकडे सांगताहेत. मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्या असल्याचे दर्शवित आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच व मीच केले असे म्हणायची सवय असल्याची टीका आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता आ. सुरेश धस त्यांच्यावर केली.
आ. आजबे म्हणाले, काल आणि आज आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे आहेत, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत, त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत, त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. खोटे बोल, पण रेटून बोल असे विरोधक वागत आहेत. शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीबाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणाकडे आले असता आपण सर्वांचे फेटे बांधून सत्कार केले. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, व काँग्रेस या महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.