धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:49 PM2018-12-26T23:49:21+5:302018-12-26T23:49:48+5:30
धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
केज तालुक्यातील सादोळा येथील संभाजी इंगळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच २० सीटी ११२५) आडस येथील विठ्ठल माने यांचा १६ टन कापूस घेऊन रविवारी रात्री ८ वाजता शेख इलियास शेख मुसा आणि बिभीषण शंकर फसके हे ट्रकचालक केजहून गुजरात मधील अमरोलीकडे जाण्यासाठी निघाले होते.
रात्री १० वाजताच्या सुमारास धारूर घाटाच्या पुढे जाताच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा ट्रक अडवला. त्यापैकी दोघेजण तेलगावच्या पुढे जाण्याच्या बहाण्याने विनंती करून ट्रकमध्ये बसले. टालेवाडी फाट्याजवळ त्यांनी ट्रक थांबविला. तेवढ्यात मागून एका जीपमधून आणखी तिघेजण आले.
तू आमच्या गाडीला कट मारून आलास असा वाद निर्माण करून त्यांनी थेट ट्रकच्या केबिनचा कब्जा घेतला आणि ट्रक चालविण्यास सुरुवात केली. धावत्या ट्रकमध्ये त्यांनी दोन्ही चालकास लाकडी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने स्वत:जवळील पिस्तूल बाहेर काढत केबिनमध्ये वरच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळी मारण्याची धमकी देत दोन्ही चालकांना बळजबरीने कसलेतरी औषध पाजले.
थोड्या वेळानंतर माजलगाव येथील साखर कारखान्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी ट्रक थांबविला आणि दोन्ही चालकांना जीपमध्ये टाकले. तब्बल दोन-अडीच तास त्यांनी दोन्ही चालकांना जीप मधून फिरवले आणि तोपर्यंत इकडे अज्ञात ठिकाणी ट्रक नेऊन अंदाजे ९ लाख ५३ हजार रुपये किमतीचा सर्व कापूस काढून घेतला.
ट्रक संपूर्ण रिकामा केल्याची फोनवरून खात्री होताच जीप मधील दोन्ही ट्रक चालकास बेशुद्ध पडेपर्यंत पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याजवळील २१ हजार रुपये रोख, दोन्ही मोबाईल काढून घेण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी दोन्ही चालकांना बेशुद्धावस्थेत जालना-मंठा रोडवर ट्रकसहित सोडून दिले.
थोड्या वेळाने शुद्धीत आल्यानंतर चालकांनी कसाबसा जवळचा टोलनाका गाठला. तिथल्या लोकांनी दोन्ही जखमी चालकांना जालना येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालक शेख इलियास शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून बुधवारी सकाळी सहा अज्ञात दरोडेखोरांवर धारूर पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. धारुर घाटात ट्रक लुटत बेदम मारहाण करण्याच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीती पसरली असून, दरोडेखोरांचा तपास लावण्याची मागणी होत आहे.