ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:18+5:302021-09-02T05:11:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे तणाव वाढला. तसेच जास्त प्रमाणात औषधांचा मारा झाल्याने डोक्यावरचे केस जात असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे तणाव वाढला. तसेच जास्त प्रमाणात औषधांचा मारा झाल्याने डोक्यावरचे केस जात असल्याचे समोर आले आहे. केस गळतीला रक्त कमी होणे, चाई लागणे, वेगवेगळे आजार, व्हायरल इन्फेक्शन अशी विविध कारणे आहेत. परंतु याला वेळीच राेखण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधी चालू करावेत तसेच आहारही प्रोटीनयुक्त ठेवावा. यामुळे केस गळतीचे प्रमाण थांबते. घरगुती उपाय करतानाही चुकीचे उपचार होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.
कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
कुठलाही आजार झाल्यानंतर केस गळतीचे प्रमाण वाढू लागते. परंतु ज्यांना कोरोना होऊन दोन ते तीन महिने कालावधी झाला आहे, अशा लोकांचीही केस गळती सुरू होत आहे. या समस्या घेऊन जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
n हिरव्या भाज्या, सफरचंद, सीताफळ अशी फळे खाण्यावर भर द्यावा तसेच दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्य, अंडे यात प्रथिने जास्त असल्याने हेदेखील खावे.
n ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे, त्यांनी पेंडखजूर, गूळ, शेंगदाणा लाडू खावे. केस कमी होण्यास आजार, व्हायर इन्फेक्शन कारणीभूत आहे. त्यामुळे वेळीच उपचार करावेत.
हे करा
आजार अथवा रक्त कमी झाल्यास केस गळती होऊ शकते. त्यामुळे वेळीच हिमोग्लोबिन तपासावे.
रक्त कमी असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त वाढवायच्या गोळ्या घ्याव्यात.
केस गळतीचे टक्कल पडणे व चाई लागणे असे दोन प्रकार आहेत. टक्कल हा नैसर्गिक तर चाई हे आजाराचे कारण आहे.
त्यामुळे याकडे कोणीच दुर्लक्ष करू नये.
कोरोनामुक्तांनाही धोका
ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांचे केस गळती होत असल्याचे रुग्ण वाढले आहेत. परंतु घाबरून जाऊ नये. तपासणी आणि योग्य उपचार केल्यास याला आळा घालता येतो. - डॉ. आय.व्ही. शिंदे, त्वचारोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड