मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा
By शिरीष शिंदे | Published: February 20, 2024 06:57 PM2024-02-20T18:57:39+5:302024-02-20T18:58:33+5:30
चार तालुक्यांतील समाज बांधव झाले आंदोलनात सहभागी
बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषण समर्थनार्थ व ओबीसीमधून मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अध्यादेश पारीत करावा या प्रमुख मागणीसाठी परळी तालुक्यातील कान्नापूर-सिरसाळा चौक ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा मराठा समाज बांधवांनी काढली. ही पदयात्रा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाैक परिसरात आल्यानंतर सहभागी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षण उपोषणाच्या पदयात्रेत धारुर, परळी, माजलगाव व वडवणी तालुक्यातील तरुण सहभागी झाले होते. १८ फेब्रुवारी रोजी निघालेली ही पदयात्रा मंगळवारी बीडमध्ये पोहोचली. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर, चौकामध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनात असंख्य तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.