दोन दिवसांत दीड टन प्लास्टिक जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:13 AM2019-10-04T00:13:39+5:302019-10-04T00:14:01+5:30
बीड पालिकेने प्लास्टिक मुक्तीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. केवळ दोन दिवसांत तब्बल १६८२ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. सहा संकलन केंद्रांसह पथकांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसानंतर दंडात्मक कारवाया केल्या जाणार आहेत.
बीड : बीड पालिकेने प्लास्टिक मुक्तीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. केवळ दोन दिवसांत तब्बल १६८२ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. सहा संकलन केंद्रांसह पथकांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसानंतर दंडात्मक कारवाया केल्या जाणार आहेत.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त बीड पालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्वच्छता व प्लास्टिक बंदीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन तीन दिवस विशेष मोहीम राबविण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले होते. त्यामुळे बुधवार व गुरूवार अशा दोन दिवसांत पथके, कामगार व स्थापन केलेल्या सहा संकलन केंद्रात तब्बल १६८२ किलो प्लास्टिक जमा केले. पैकी ३१३ किलो प्लास्टिकहे दुकाने व नागरिकांकडून जप्त करण्यात आले आहे. राहिलेले १३६९ किलो प्लास्टिक हे कामगारांनी रस्त्यावरून, अस्ताव्यस्त व इतर सार्वजनिक ठिकाणाहून जप्त केले.
मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख युवराज कदम, भागवत जाधव, महादेव गायकवाड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका, प्रशांत ओव्हाळ, मुन्ना गायकवाड आदी कर्मचारी काम पहात आहेत.