बीडमध्ये पालिकेचा बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:21 AM2018-02-09T00:21:30+5:302018-02-09T00:21:41+5:30
अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
बीड शहरात गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले. याचा परिणाम वाहतुकीवर होत होता. अतिक्रमणातून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणधारकांना पालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या.
परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणधारक स्वत:हून अतिक्रमणे काढत नसल्याचे दिसताच पालिकेने गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम होती घेतली. साठे चौकापासून मोहिमेला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात रस्त्यांवर लागलेल्या हातगाड्यांसह छोट्या मोठ्या टपºयांवर हातोडा फिरवण्यात आला. नगर परिषद मार्गे भाजीमंडईत मोहीम पोहचली. येथे काही वेळ भिंत पाडण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. पालिकेने नियमांवर बोट ठेवून भाजीमंडईतील सर्व अतिक्रमणे हटविली.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, विद्युतचे अभियंता मुंडे, ट्रेसर सय्यद लईक, स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, भागवत जाधव, आर. एस. जोगदंड, सुनील काळकुटे, भारत चांदणे, ज्योती ढाका यांच्यासह शेकडो पालिका, पोलीस कर्मचाºयांसह आरसीपीचे जवान बंदोबस्तावर होता.
कारवाईत सातत्य महत्त्वाचे
यापूर्वीचे अनुभव पाहता पुढे अतिक्रमण हटविले की मागे जैसे थे परिस्थिती दिसून येते. कारवाईत सातत्य राहिले तर अतिक्रमण करण्यास कोणीही पुढे येणार नाही. जे पुढे येतील त्यांच्यावर कठोर कारवाईची गरज आहे. या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाईत पुजा-याने आणला अडथळा
पालिकेकडून नियमाप्रमाणे अतिक्रमण हटविणे सुरु असताना बशीरगंज चौकातील अतिक्रमित भिंत पाडताना येथील एका पुजा-याने अडथळा आणला. स्वत:च्या डोक्यात दगड मारुन घेत त्याने संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी डॉ. जावळीकर, उप अधीक्षक खिरडकर, सुलेमान यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले. कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर या पुजाºयाला रुग्णालयात दाखल करुन अतिक्रमण हटाव मोहीम पुढे सरकली.
कारवाईत दुजाभाव नाही
अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य ठेवले जाईल. या कारवाईत दुजाभाव झालेला नाही. कोणाचीही गय केलेली नाही. नागरिकांनी अतिक्रमणे काढून पालिकेला सहकार्य करावे. नसता कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल.
- डॉ. धनंजय जावळीकर
मुख्याधिकारी, न.प.
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होईल. याउपरही वाहनधारकांनी वाहने रस्त्यावर उभी केल्यास त्यावर कारवाई केली जाईल. पालिकेच्या मदतीने वाहने जप्तही केली जातील.
- सुधीर खिरडकर
पोलीस उप अधीक्षक