खासबाग परिसरात अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:04 AM2019-02-23T00:04:19+5:302019-02-23T00:05:39+5:30
बीड नगर पालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी खासबाग परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.
बीड : बीड नगर पालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी खासबाग परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामुळे परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तर काहींनी कारवाईच्या भितीने स्वता:हून अतिक्रमणे काढून घेतली. शनिवारीही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बीड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. हाच धागा पकडून पालिकेने शुक्रवारी खासबाग परिसरात मोहीम हाती घेतली. रस्त्यांवर शेड बांधून राहणाऱ्या तीन घरांवर हातोडा फिरविण्यात आला. तसेच इतर अतिक्रमणेही काढण्यात आली. तर याच भागातील सात नागरिकांनी आपण स्वत: अतिक्रमणे काढून घेतो, नुकसान करू नका, एका दिवसाची मुदत द्या, असे लेखी पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे या घरांवरील कारवाई टळली. शनिवारी कुठलेही म्हणने न ऐकून घेत अतिक्रमणे हटविली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, खासबाग परिसरात अनेक महिन्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. खासबाग प्रमाणेच शहरात इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरूंद बनून वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने या अतिक्रमणांवरही हातोडा फिरवावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.
ही कारवाई उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख व्हि.टी.तिडके, भारत चांदणे, ज्योती ढाका, भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, महादेव गायकवाड, गणेश वडमारे, राजु वंजारे आदींनी केली.