दुर्मिळ! शेळीने मागील वर्षी ४ तर यंदा ५ पिलांना दिला जन्म, पशुपालकाच्या घरी आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:35 PM2023-01-31T17:35:33+5:302023-01-31T17:35:56+5:30
आष्टी तालुक्यातील दादेगांव येथील आश्चर्यकारक घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड) : शेळीने आजवर दोन, तीन पिलांना जन्म दिल्याची माहिती आहे. पण शेळीने एकाचवेळी चक्क पाच पिलांना जन्म दिल्याची एक आश्चर्यकारक घटना आष्टी तालुक्यातील दादेगांव येथे मंगळवारी दुपारी घडली.
आष्टी तालुक्यातील दादेगांव येथील गंगाधर आसराजी पोटे यांनी तीन वर्षांपूर्वी एक शेळी विकत घेतली. या शेळीने पहिल्या वर्षी एक, दुसर्या वर्षी चार तर आता तिसऱ्या वर्षी चक्क पाच पिलांना जन्म दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, पाचही पिलं ठणठणीत आहेत. तालुक्यात अशी घटना प्रथमच पहावयास मिळाली असल्याचे पशुपालकांचे म्हणे आहे. या घटनेमुळे पशुपालक पोटे आनंदित आहेत. तीन वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांत घेतलेल्या शेळीने मागील वर्षी चार तर आता पाच पिलांना जन्म दिल्याचे पोटे यांनी सांगितले. शेळीची प्रकृती चांगली असून पंचक्रोशीतून शेतकरी, ग्रामस्थ पिल पाहण्यासाठी येत आहेत.
शेळी साधारण तीन ते चार पिलांना जन्म देते. पण पाच पिलांना जन्म दिला म्हणजे विशेष गोष्ट असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी सांगितले.