हर हर महादेव, बम बम भोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:50 PM2020-02-21T23:50:52+5:302020-02-21T23:51:28+5:30
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्यातिर्लिंंगापैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर, बीड शहरातील कनकालेश्वर, सोमेश्वर,पापनेश्वर, नीलकंठेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, जटाशंकर, मार्कंडेश्वर मंदिर तसेच चाकरवाडी, श्रीक्षेत्र कपिलधार, नारायणगडसह जिल्ह्यातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती.
बीड : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्यातिर्लिंंगापैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर, बीड शहरातील कनकालेश्वर, सोमेश्वर,पापनेश्वर, नीलकंठेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, जटाशंकर, मार्कंडेश्वर मंदिर तसेच चाकरवाडी, श्रीक्षेत्र कपिलधार, नारायणगडसह जिल्ह्यातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. हर हर महादेव, बम बम भोले, जय भोलेनाथ आदी घोषणांनी शिवालयांचा परिसर दुमदुमला.
राजापूर येथे दर्शनासाठी गर्दी
तलवाडा : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील शिवालयात तसेच गोदाकाठी वसलेल्या राजेश्वर व घाटावरील रामेश्वर या मंदिरात हजारो भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गंगेच्या पाण्याने स्नान करत भाविकांनी दर्शन घेतले. येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गावकऱ्यांकडून भाविकांना फराळासह फळांचे वाटप झाले. शनिवारी सांगता असून काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.
तपोवन, गोवर्धनमध्ये गर्दी
सिरसाळा: परळी - बीड या मुख्य मार्गवर सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या गोवर्धनच्या अजुर्नेश्वर तसेच तपोवनच्या तपेश्वर शिव मंदिरात सिरसाळ्यासह परिसरसतील ग्रामस्थांनी रांगा लावून शिस्तीत दर्शन घेतले. गावातील मानकरी यांच्या हस्ते महापूजा अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुले करण्यात आले. तसेच गोवर्धन येथील अजुर्नेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळाली. भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता.
श्री सिध्देश्वर, कारी
धारूर : तालुक्यातील कारी येथील पुरातन श्री सिध्देश्वर मंदिरात भाविक भक्तांनी श्री सिध्देश्वराचे दर्शन घेतले. तसेच येथे सुरू असलेल्या अखिल हरिनाम सप्ताह व श्री भागवत कथा याची सांगता शनिवारी प्रशांत महाराज खानापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर गावकºयांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
सोमेश्वर मंदिरात कीर्तन
लोखंडी सावरगाव : येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी येथील शंकरराव धोंडीबा माने यांच्या शेतातील सोमेश्वर भगवान महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गणेश महाराज हंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर केशव महाराज शास्त्री (टाकळीकर) यांचे कीर्तन झाले. यावेळी नंदकिशोर मुंदडा, सरपंच सूर्यकांत माने, उद्धव पवार, महादेव हंगे, भारत माने, अप्पाराव तारकर, श्रीधर माने सह लोखंडी सावरगाव, कानडी वरपगाव, माकेगाव, सनगाव येथील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
अभोरा येथे कीर्तन
अंभोरा : आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे अंखड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अक्रूर महाराज साखरे शेवगाव याचे कीर्तन झाले. याप्रसंगी वाघळूज, धानोरा सुलेमान, देवळा, आठवड, सालेवडगाव, हिवरा, पिंपरखेड, नांदूर या परिसरातील भाविक उपस्थित होते.
राजा हरिश्चंद्राच्या दर्शनाला गर्दी
वडवणी : महाशिवरात्रीनिमित्त देशातील एकमेव राजा हरिश्चंद्र देवस्थानावर दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता. गुरूवारी रात्री १२ वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपºयाºयातील भाविकांनी रांगेत थांबून शांततेत मनोभावे दर्शन घेतले. बेल व पुष्पहार अर्पण केले. पहाटेपासून दुपारपर्यंत मोठ्या रांगा होत्या. हर हर महादेव, राजा हरिश्चंद्र महाराज की जय या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुले होते. मंदिर परिसरात पोलिसांचा दगडा बंदोबस्त होता. यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. शनिवारी मठाधिपती भगवान महाराज राजपूत यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.