हर हर महादेव! प्रभू वैद्यानाथाचा दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:16 PM2023-08-21T13:16:21+5:302023-08-21T13:16:51+5:30
पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
- संजय खाकरे
परळी(बीड): 'हर हर महादेव', 'ओम नमः शिवाय'चा गजर करत पहिल्या श्रावण सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शिवामूठ तांदूळ व बिल्वपत्र वाहून भक्तांनी दर्शन घेतले. नागपंचमीची मंदिरपरिसरात महिलांनी भूलई खेळली. वैद्यनाथ मंदिरात असलेल्या नागनाथाच्याच्या मंदिरात पूजन करीत भाविकांनी दर्शन घेतले.
निज श्रावणमासास 17 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. आज 21 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार असल्याने रात्री बारा वाजल्यापासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. हजारो शिवभक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी ट्रस्टच्यावतीने पास व धर्मदर्शनची महिला -पुरुषांची स्वतंत्र रांग आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यात आली.
वैद्यनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुष्पमाळाने सजविण्यात आले आहे. पुष्प सजावटीमुळे मंदिर परिसर मनमोहक दिसून येत आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास पुन्हा गर्दी वाढली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्यासोबत परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख व इतर पदाधिकारी होते.
रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली तर दुपारी बारा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख ,विश्वस्त राजेश देशमुख यांनी लोकमत ला दिली.
मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले परळी शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे ही मंदिरात पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते. पंचमुखी महादेव मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, सुर्यवेश्वर मंदिर, नगरेश्वर मंदिर व शहरातील व ग्रामीण भागातील मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले होते. वैद्यनाथ मंदिर रोडवर बिल्व पत्र घेण्यासाठी पहाटेपासुनच भाविकांची गर्दी झाली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाविकांना मोफत प्रसाद
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोफत प्रसाद (साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडू) वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली.