वाटणीच्या वादातून सख्या भावाकडून त्रास; कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 06:58 PM2021-11-08T18:58:30+5:302021-11-08T18:59:21+5:30
विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद.
अंबाजोगाई : वाटणीच्या वादातून सख्याने भावाने आणि त्याच्या कुटुंबाने ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यास मागील एक-दिड वार्हपासून सतत त्रास दिला. अखेर त्रासलेल्या त्या वृद्धाने घराच्या परसातील कडीपत्त्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.०७) पहाटे अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे उघडकीस आली. याप्रकरणी भावासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गंगाधर देवराव हुलगे ( ६७ ) असे त्या मयत वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. कुंबेफळ शिवारात त्यांची शेतजमीन आहे. भाऊ मुरलीधर देवराव हुलगे याच्यासोबत त्यांचा वाटणीचा वाद होता. या वादातून मुरलीधर, सिद्धेश्वर मुरलीधर हुलगे, मुरलीधर हुलगे आणि स्वाती किशोर हुलगे हे मागील एक दिड वर्षापासून गंगाधर आणि त्यांच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास देत होते. विहिरीच्या पाण्यावरून आणि गंगाधर यांच्या शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद घालत.
त्यांनी यापूर्वी गंगाधर यांच्यासह कुटुंबियांना मारहाणही केली होती. अखेर, सततच्या त्रासाला कंटाळून गंगाधर यांनी रविवारी पहाटे ५.३० च्या पूर्वी घराच्या परसातील कडीपत्त्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिट्ठी लिहून बनियानला लावून ठेवली. याप्रकरणी सुदर्शन गंगाधर हुलगे यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर, सिद्धेश्वर, कविता आणि स्वाती हुलगे यांच्यावर आम्हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.