कष्टाने पिकविलेला भाजीपाला मातीमोल, शेतात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:26+5:302021-03-28T04:31:26+5:30
धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. ...
धारूर : बाजार बंद व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल झाला असून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील जायभायवाडी येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी हताश होत शेतात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यातील डोंगराळ भागातील जायभायवाडी येथे जलसंवर्धनाची कामे झाल्याने फळबाग व भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र, मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर, या वर्षी ऐन भाजीपाला विक्रीचा हंगाम असताना कडाडून ऊन पुन्हा सुरू झाल्याने जिवापाड मेहनत व खर्च करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. उत्पादनाचा खर्च सोडा, तोडणीचे पैसे मिळणे मुश्कील झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
येथील शेतकरी मनोज जायभाये याने आपल्या डोंगराळ जमिनीवर मेहनत करून पाऊण एकर क्षेत्रावर वांग्याची लागवड केली. आता चांगले पीक हातात येत असताना बाजार बंद व लॉकडाऊनमुळे २५ किलो कॅरेट ४० ते ५० रुपयांत विकण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्याने वांग्याच्या शेतात आपले बैल, शेळ्या, म्हशी सोडल्या. तोडलेले वांगे यांना खाऊ घातले. बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने परिस्थितीमुळे हताश होऊन हा निर्णय घेतल्याचे मनोज जायभाये यांनी सांगितले. जायभाये यांच्याप्रमाणे सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे.
===Photopath===
270321\img-20210325-wa0101_14.jpg