coronavirus : ‘त्या’कोरोनाबाधित महिलांचा सामंजस्यपणा कौतुकाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:23 PM2020-05-25T19:23:33+5:302020-05-25T19:35:33+5:30

पाटोदा तालुक्यातील आठेगाव पट्ट्यातील वाहली येथे मुंबई येथून तीन महिला आल्या. त्या फक्त सुशिक्षित नव्हत्या; तर कर्तव्यदक्ष, सामंजस्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या होत्या.

The harmony of ‘those’ corona-affected women is admirable | coronavirus : ‘त्या’कोरोनाबाधित महिलांचा सामंजस्यपणा कौतुकाचा विषय

coronavirus : ‘त्या’कोरोनाबाधित महिलांचा सामंजस्यपणा कौतुकाचा विषय

Next
ठळक मुद्देवहाली आरोग्य केंद्रातील हृदयस्पर्शी प्रसंग मुंबईहून परतल्यानंतर स्वत:हून क्वारंटाईन

- अनिल गायकवाड 

कुसळंब : गत दोन महिन्यापासून जगातून कोव्हीड - १९ विषाणूने सर्वांच्या हृदयात धडकी भरवल्यानंतर भारतातील विविध राज्यात सुद्धा या विषाणूने आपला स्वयंस्फूर्त शिरकाव घडवल्यानंतर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढली; त्यामुळे सर्वत्र प्रचंड भितीचा थरकाप उडाल्यानंतर राज्यात सरतेशेवटी बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येने उग्र रूप धारण केल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, गेवराई, वडवणी, केज, तालुक्यात विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. दरम्यान,सुरक्षित असलेल्या पाटोदा तालुक्यातील आठेगाव पुठ्यातील वाहली व पाटोदा शहर या ठिकाणी अनुक्रमे दोन आणि एक अशा तीन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. पाटोदा तालुक्यातील आठेगाव पट्ट्यातील वाहली येथे मुंबई येथून तीन महिला आल्या. त्या फक्त सुशिक्षित नव्हत्या; तर कर्तव्यदक्ष, सामंजस्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या होत्या. ‘त्यांच्या एकूण सहकार्याच्या वृत्तीचा आम्हाला आज अनुभव आला; त्या एक आदर्श महिला म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो..’ अशा शब्दात डॉ. मोहितकुमार कागदे यांनी भावना व्यक्त केल्या.

वाहाली येथे आल्यानंतर त्या महिला गावात कुठेही न जाता त्यांनी स्वत:हून आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील दूर अंतरावरील एका रूममध्ये त्या क्वारंटाईन झाल्या. एक दोन दिवसानंतर त्यांना लक्षणे दिसू लागल्यावर त्यांनी स्वत:हून डॉक्टरांना ही माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा गतिमान करून त्यांना बीडकडे हलवण्यासाठी प्रक्रिया पार पडत गेली. दरम्यान, येथे गाडीत बसताना काही अज्ञानी त्यांची शूटिंग काढण्याचा प्रयत्न होते, तेव्हा त्या महिलांना वाईट वाटले. त्या महिला त्यांना म्हणाल्या, ‘आम्ही पण माणसे आहोत’. तेव्हा उपस्थित ही अक्षरश: ओशाळले... मोबाईल आपोआप खिशात गेले...

मुंबईहून आल्यानंतर या महिला कोणाच्याही संपर्कात गेल्या नाहीत. घरच्यांनाही त्यांनी टाळले. प्रारंभी पासून स्वत: हून क्वारंटाईन राहिल्या. त्यामुळे संपूर्ण गाव आज सुरक्षित राहू शकला. नागरिक म्हणून कर्तव्याच्या बांधिलकीचा उत्तम नमुना म्हणून समाजधुरीण या घटनेकडे पहात आहेत. दरम्यान, वाहली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चैताली भोंडवे आणि डॉ. मोहितकुमार कागदे तसेच टीमची  रुग्णांविषयीची अत्यंत तळमळीची आणि सेवेची भावना पाहता बबनराव उखांडे, चंद्रकांत पवार, प्रा. बिभीषण चाटे, भाऊसाहेब पवार, दयानंद सोनवणे, आरिफ शेख, रविराज पवार, सुनील आढाव आदींनी कौतुक करत संकटकाळात मिळणाऱ्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.   

आम्ही पण माणसं आहोत...!
कोरोना बाधित  महिला जेंव्हा गाडीत बसू लागल्या, तेव्हा काही अज्ञानी, हौशी व दुसऱ्याच्या दु:खाचा उत्सव करणारे काही जण मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा त्या महिलांना अत्यंत वाईट वाटले. त्या म्हणाल्या, ‘अरे बाबांनो, आम्ही पण माणसं आहोत; ही वेळ कुणावर येऊ नये...’ अशा दु:खद अंतकरणाने भावनाविवश होत त्यांनी खंत व्यक्त केली.

त्यांचा सुसंस्कृतपणा कौतुकाला पात्र
सदर महिला मुंबईहून आल्यानंतर स्वत:हून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील रुममध्ये क्वारंटाईन झाल्या. जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटले तेव्हा त्यांनी स्वत:हून पुढे येत तपासणीला स्वॅब दिले. कोणाच्याही संपर्कात त्या आल्या नाहीत. त्यांचे एकूण वागणे सुसंस्कृत, सामंजस्य व सामाजिक बांधिलकीला शोभेल असे राहिले... त्यांचा आम्हाला अभिमान आहे !
- डॉ.चैताली भोंडवे, डॉ. मोहितकुमार कागदे (प्राथमिक आरोग्य केंद्र, वहाली)

Web Title: The harmony of ‘those’ corona-affected women is admirable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.