'फिक्की'च्या राष्ट्रीय पुरस्काराने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 10:33 PM2019-09-01T22:33:24+5:302019-09-01T22:38:36+5:30
गुन्हेगारी व दहशतवादापासून परावृत्त होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये केली जागृती
बीड : फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीच्या ( फिक्की) वतीने यावर्षीचा बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग पुरस्कार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत मानाचा हा पुरस्कार मागील आठवड्यात दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार पोद्दार यांना प्रदान करण्यात आला. फिक्की या संस्थेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पोलिसिंगसाठी पुरस्कार दिला जातो. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी औरंगाबाद, कोल्हापूर, मालेगाव, नागपूर, येथे कम्युनिटी पोलिसिंगसाठी विशेष प्रय्तन केले होते. हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी गुन्हेगारी आणि दहशतवादी मार्गावरुन परावृत्त केले होते. त्यासाठी त्यांनी विशेष शिबीर राबविले होते. सोबतच मालेगाव येथे ‘फेक न्यूज’ विरोधात त्यांनी राबविलेली मोहीम देखील देशभरात गाजली होती.
या दोन्ही कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचा मान बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाला आहे. तसेच देशातील सर्व राज्यातून उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महाराष्ट्र पोलीसांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.