हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 01:41 PM2017-12-25T13:41:17+5:302017-12-25T13:41:38+5:30
कोणत्याही समारंभात हारतुर्यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.
अंबाजोगाई (बीड) : कोणत्याही समारंभात हारतुर्यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रमेशराव आडसकर, संजय दौंड, हनुमंतराव मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सुरेश धस म्हणाले की, दर्जेदार व दुर्मिळ पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ही पुस्तके व ग्रंथ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचले तर अनेक प्रकारचे अज्ञान या माध्यमातून दूर होईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, समस्यांचा हुंदका हा साहित्याचा एक भाग आहे. राजकीय विचारधारेवर साहित्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं त्यामुळं साहित्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या या भरकटलेल्या पिढीला वाचन चळवळीतूनच प्रेरणा मिळेल. ग्रंथ हेच खरे गुरू असून प्रत्येकाच्या घराघरातील कापाटात पुस्तकांना प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली.
संमेलनात मराठवाड्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या विविध प्रकाशकांचे ग्रंथ प्रदर्शन व ४५ विक्री केंदे्र लक्ष वेधत होती. सोमवारपर्यंत प्रदर्शन राहणार असून, दुर्मिळ ग्रंथ येथे उपलब्ध झाले आहेत.
सेल्फी स्थळ ठरले संमेलनाचे आकर्षण
या संमेलनानिमित्त संमेलनस्थळी निर्माण करण्यात आलेले ‘सेल्फी स्थळ’ गर्दी खेचून घेत आहे. संमेलनस्थळी ७ फुट उंचीचे हे स्थळ निर्माण करण्यात आलेला असून साहित्याचे प्रतिनिधित्व करणा-या पुस्तक, दौत, लेखणी आणि मोरपीस या साधनातून या सेल्फी स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ७ फुट उंचीचा हा ‘सेल्फी कट्टा’ संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकुंदराज कटटा आकर्षक ठरत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.