‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:04 PM2023-02-22T12:04:46+5:302023-02-22T12:10:34+5:30

अनाथांचा आधार हरपला; चाकणजवळ अपघाताची वार्ता कळताच बीड जिल्हा सुन्न

'Harvale Abhaal...', Sudam Bhondve along with four family member killed, Sondara Gurukul's base lost | ‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

googlenewsNext

- अजय जोशी
पाटोदा (बीड) :
गरीब, अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या आणि शेकडो-हजारो गरीब, अनाथ मुलांची हक्काची सावली झालेले सुदाम भोंडवे व सिंधुताई या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या घटनेचे वृत्त समजताच अनाथ मुलांचेच नव्हे तर संपूर्ण गुरुकुल परिवाराचे आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांचे काळीज अक्षरशः हेलावून गेले. सुदाम काकांच्या जाण्याने सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला, अशी संवेदना प्रत्येक जण व्यक्त करीत होता.

नेहमी दुष्काळी छायेत आणि आर्थिकदृष्ट्या मागास बीड जिल्ह्यातून साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात दरवर्षी दोन लाखांहून जास्त कुटुंबे सहा महिन्यांसाठी तात्पुरते स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येतो. हा अभावच सामाजिक समस्यांचे मूळ असल्याने १९८६ मध्ये राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम भोंडवे यांनी स्वत:ची जमीन देत सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली. एका छोट्याशा झोपडीतून ज्ञानदानाची सुरुवात करत गत ३७ वर्षांत तीन हजारांवर विद्यार्थी सोनदरा गुरुकुलात घडले आहेत. शासनाचा एक छदामही न घेता मूल्याधिष्ठित पिढी घडवून नवरचना साधण्याचे कार्य सुदाम भोंडवेंकडून सुरू होते. गुरुकुलातील मुले म्हणजेच त्यांचं कुटुंब होतं. गुरुकुलाचा उत्तरोत्तर कार्यविस्तार व्हावा, हेच त्यांचे ध्येय होते. 

गुरुकुलाची जबाबदारी अश्विन भोंडवे सहकारी कार्यकर्त्यांवर सोपवल्यानंतरही काकांमध्ये नव्या कामाची सुरुवात करण्याची ऊर्जा दिसली. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मंगळवारी सोनदरा गुरुकुल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुदाम काका, सिंधू मामी, कार्तिकी व चिमुकली आनंदी यांच्या एका क्षणात जाण्याने आभाळ कोसळले. त्यामुळे सारे गुरुकुल अनाथ झाले. ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी,’ अशा ध्येयाने वाटचाल करणाऱ्या सुदाम काकांच्या जाण्याने सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला आहे.

डोळ्या देखत गमावले अख्खे कुटुंब 
अश्विन भोंडवे हे वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी आणि मुलगी आनंदी यांच्यासह कारमधून ( एमएच १२ ईएम २९७८ ) चाकणकडे चालले होते. याचवेळी अपघात झाला. यात केवळ अश्विन बचावले. डोळ्यादेखत अख्खे कुटुंब गमावल्याने अश्विन देखील बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 'Harvale Abhaal...', Sudam Bhondve along with four family member killed, Sondara Gurukul's base lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.