काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:17+5:302021-09-25T04:36:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पिकेही जोमदार आली होती. परंतु अतिपावसामुळेही काढणीला आलेली पिक आता पाण्यात आहेत. त्यामुळे निसर्गाने दिलेले, त्यानेच हिरावलं असेच म्हणावे लागेल. आता सरकारनेच शेतकऱ्यांसाठी धावून येण्याची गरज आहे. सोमवारी (दि.२०) पासून सुरू झालेल्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाले आहे.
यंदा ५० हजारांपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पाऊसही वेळेवर झाल्याने पेरणीची वेळेवरच झाली. पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार पाऊस होत गेला. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसला, मात्र सुपीक जमिनीवरची पीक, जोमात होती. या महिन्यात गरजेपेक्षा जास्त पाऊस होत गेल्याने चांगल्या पिकांचेही नुकसान होत गेले. मोठे पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व तलाव व साठवण तलाव तुडुंब भरले. त्यानंतर पिकांना पाणी लागण्यास सुरुवात झाली. पुन्हा चार दिवस पावसाची उघडीप झाल्याने, शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू केली. मजुरांची जुळवा, जुळव करून गुत्ते पद्धतीने काढणीचा ठरावही केले. आता दोन दिवसांत सोयाबीन काढायचे म्हटले तर, पुन्हा सोमवारपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आणि होते नव्हते ते पीकही पाण्यात गेले.
आता हा पाऊस कधी थांबणार आणि पिकातील पाणी कधी निघणार अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील पूस परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात आहे. येल्डा परिसरातील काही, शेतकऱ्यांनी हाती लागेल तेवढे चिखलातच सोयाबीन काढणी सुरू केली आहे. हे भिजलेले सोयाबीन वाळवायचे कसे? आता त्याला मोड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...
भावही कोसळले
आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन येऊ लागले की, त्याचे भाव अर्ध्यावर खाली आले. एकीकडून निसर्गाने हिरावले, तर दुसरीकडे बाजारातही भाव पडले. तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचे? असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या बोजातून कसा बाहेर येईल हाच प्रश्न आहे. हे आता सरकार भरोसेच आहे.
240921\img-20210924-wa0066.jpg
अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची अवस्था.