सत्ता असताना एक तरी विकासाचे काम केले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:14 AM2019-10-15T00:14:49+5:302019-10-15T00:15:27+5:30
राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
परळी : राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
बुडत्या जहाजात बसू नका
राष्ट्रवादीचे जहाज आता बुडणार त्यात बसू नका असे सांगून त्या म्हणाल्या की, विरोधक आता विकासाच्या गप्पा मारत आहेत,पण गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती तेंव्हा त्यांनी एक तरी विकासाचे काम केले का? मग आता कोणत्या तोंडाने मतदान मागत आहेत. मला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे म्हणून निवडणूक जड असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. खोटे बोलण्यात त्यांना पीएच.डी. मिळाली आहे मात्र जनता सर्व ओळखून आहे. म्हणून ती माझ्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणारी सत्ता ही भाजपा महायुतीची असणार आहे आणि मी त्या माध्यमातून उर्वरित विकास पूर्ण करणार आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यावरून आपले महत्त्व लक्षात घ्या. येणाऱ्या काळात मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, बंकटराव कांदे, निळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, राजाभैया पांडे, मारूती मुंडे, सुग्रीव मुंडे, जगन्नाथ मुंडे, संजय मुंडे, रामकिशन काळे यांच्यासह जिरेवाडी गटातील सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
विकासासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचा
गेल्या पाच वर्षांत मी आपल्या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामीण भागात विकास पोहचला आहे. चांगले रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली.
मी विकासाला गती देण्याचे काम केले, ही गती वाढविण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
मी मताचे राजकारण करीत नाही तर विकासाचे करते. मतदारसंघाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला. अनेक विकास कामे झाली हे मतदारांना माहीत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.